परमवीर सिंग यांच्या रूपाने बऱ्याच वर्षांनी ठाण्याला धडाकेबाज प्रतिमा असलेला पोलीस आयुक्त लाभला आहे. सिंग यांनी यापूर्वी दोन वेळा ठाणे पोलीस आयुक्तालयात उपायुक्त पदावर काम केले आहे. त्या वेळची परिस्थिती वेगळी असली तरीही तेव्हाच्या आणि आताच्या प्रश्नांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिंग यांनी ‘कायदा-सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान माझ्यापुढे आहे’ अशी कबुली देऊन टाकली. ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांतील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांची जाण सिंग यांना आहे. फक्त आता त्यावर उत्तरे शोधण्यासाठी ते काय कृती करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
रा ज्यातील पोलीस दलात आपल्या नावाचा ठसा उमटविणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये परमवीर सिंग यांचे नाव आवर्जून घेतले जाते. गेल्या आठवडय़ात परमवीर सिंग यांनी ठाणे पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली आणि त्यांच्या रूपाने बऱ्याच वर्षांनी या आयुक्तालयाला धडाकेबाज अशी प्रतिमा असणारा अधिकारी आयुक्तपदी मिळाला. पदभार स्वीकारल्यानंतर बहुतेक अधिकारी पत्रकारांशी अधिक बोलणे टाळतात किंवा आठ दिवसांत कार्यक्षेत्राची माहिती घेऊन कामाची रूपरेषा मांडणार, अशा स्वरूपाची उत्तरे देतात. स्वाभाविकच त्या अधिकाऱ्यांसाठी कार्यक्षेत्र नवे असते आणि स्थानिक प्रश्नांविषयी जाणून घेतल्यानंतरच एखाद्या विषयी बोलावे, असां अनेकांचा िपड असतो. परमवीर सिंग हे अशा सावध प्रतिक्रियांविषयी अपवादच म्हणावे लागतील. ज्या दिवशी नियुक्ती झाली, त्याच दिवशी त्यांनी पदभार स्वीकारला आणि पत्रकारांशी तब्बल एक तास मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि आपली कार्यपद्धती कशी असेल याविषयीची रूपरेषाही पत्रकारांपुढे मांडली. ‘कायदा-सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान माझ्यापुढे राहणार असून त्यासाठी मी सर्वपरीने प्रयत्न करणार आहे’, असे त्यांनी या वेळी आवर्जून सांगितलेच, शिवाय ठाणे पोलिसांचे यापुढे महिला सुरक्षेला अधिक प्राधान्य असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. यावरून सिंग यांना ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरची नस चांगली माहीत असल्याचे स्पष्ट झाले. आयुक्तालयाच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या किमान सात ते आठ घटना दररोज घडतात हे गंभीर असल्याची कबुलीही त्यांनी दिली. दुसऱ्याच दिवशी कल्याणातील इराणी वस्तीवर पोलिसांचे छापे सुरू झाले. या इराणी वस्तीत सोनसाखळी चोर दबा धरून बसतात हे या भागातील शेंबडं पोरही सांगेल. मग पोलिसांना हे माहीत नाही यावर कुणाचाही विश्वास बसणे शक्य नव्हते. परमवीर सिंग यांनी कल्याण परिसरात यापूर्वी काम केल्याने चोरांचे अड्डे त्यांना ठावूक आहेत. त्यांच्या आदेशाने इराणी वस्तीतील चोर हुडकून काढण्याची मोहीम सुरू झाली असली तरी कायदा-सुव्यवस्थेच्या आघाडीवर जुन्याच असलेल्या दुखण्यावर ते कायमस्वरूपी इलाज कसा शोधून काढतात याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
परमवीर सिंग यांनी यापूर्वी दोन वेळा ठाणे पोलीस आयुक्तालयात उपायुक्त पदावर काम केले आहे. त्या वेळची परिस्थिती वेगळी असली तरीही तेव्हाच्या आणि आताच्या प्रश्नांमध्ये फारसा फरक नाही. विशेष शाखेत उपायुक्त म्हणून काम केल्यामुळे त्यांना आयुक्तालयातील बरेचशे प्रश्न माहीत आहेत. विशेष शाखेच्या उपायुक्ताकडे संपूर्ण आयुक्तालयाचा परिसर येतो. हा विभाग महत्त्वाची सुरक्षा पुरविणे आणि आयुक्तालयातील छोटय़ा-मोठय़ा घडमोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे काम पाहतो. या विभागात काम केल्यामुळे आयुक्तालयातील प्रश्न त्यांच्यासाठी नवे नाहीत. या विभागातील कामाचा अनुभव लक्षात घेऊन त्यांनी कामाची रूपरेषा ठरवली असावी.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे अशी पाच परिमंडळे येतात. या पाचही परिमंडळांची लोकसंख्या आजमितीस सुमारे ९० लाखांच्या घरात गेली असून त्या तुलनेत पोलिसांची संख्या फारच कमी आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात सुमारे साडेनऊ हजार अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी सुमारे पाचशे ते सहाशे अधिकारी -कर्मचारी कोर्ट आणि इतर कारकुनी कामात व्यस्त असतात. लोकसंख्येच्या मानाने हा आकडा फारच कमी आहे. ठाणे आयुक्तलय क्षेत्रात मोठी खाडी किनारपट्टी असल्याने इथे सागरी सुरक्षेचा प्रश्न कायम आहे. काही वर्षांपूर्वी घोडबंदरच्या नागला बंदरमध्ये मोठय़ा प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला होता. २६ /११ च्या घटनेनंतर घोडबंदर भागातील खाडी किनाऱ्याजवळील खारफुटीच्या झुडपात दोन अतेरिकी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हा संपुर्ण परिसर पिंजून काढल्यानंतर पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. यामुळे ही केवळ अफवा असल्याचे उघड झाले होते. गेल्या काही वर्षांपूर्वी ठाणे आयुक्तालय क्षेत्रातून परमवीर सिंग यांनी लष्कर-ए-तोयबाचे चार अतिरेकी पकडले होते. सिमीच्या कारवायांमुळे भिवंडीतील पडघा परिसर चर्चेत आला. तसेच मुंब्रा, राबोडी, भिवंडी आणि कल्याण या परिसरात यापूर्वी अनुचित घटना घडल्या आहेत. यामुळे हे परिसर संवेदनशील म्हणून ओळखले जातात आणि पोलिसांचीही या परिसरातील हालचालीवर बारकाईने नजर असते. याशिवाय, ठाणे जिल्ह्य़ाच्या आदिवासी भागात नक्षल चळवळ उभी करण्यासाठी आलेल्या दोन नक्षलवाद्यांना ठाणे शहरातून पोलिसांनी अटक केली होती. हा आयुक्तालय क्षेत्रात घडलेला इतिहास असला तरी त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खबरदारी घेणे, हे पोलिसांचे काम आहे. त्याप्रमाणे ठाणे पोलीस दल काम करीत आहे. पण, त्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. सुमारे ९० लाखांच्या लोकसंख्येच्या सुरक्षेसाठी साडेनऊ हजारांचा फौजफाटा तैनात कसा करायचा, असा प्रश्न पोलिसांपुढे उभा राहतो.
नव्या पोलीस ठाण्यांचा प्रश्न प्रलंबित
संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात सध्या ३३ पोलीस स्थानके असून लोकसंख्येमुळे तीन ते चार पोलीस स्थानकांचे विभाजन करून नवीन पोलीस स्थानके तयार करण्याचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. आयुक्तालय क्षेत्रातील घोडबंदर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि अंबरनाथ आदी शहरांत मोठमोठय़ा गृह प्रकल्पांचे काम सुरू आहे. या गृह प्रकल्पांमध्ये भविष्यात नागरिक राहायला येतील. यामुळे भविष्यात आजच्या लोकसंख्येत आणखी भर पडेल आणि पोलिसांवर सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची जबाबदारी आणखी वाढेल. मुंबई शहराची लोकसंख्या पावणेदोन कोटींच्या घरात असून या शहराच्या सुरक्षेकरिता ४० हजार पोलिसांचा फौजफाटा आहे. मुंबई शहराला खेटूनच असलेल्या ठाणे आयुक्तालयात मात्र त्या तुलनेत पोलीस बळ कमी आहे. मुंबईत कामानिमित्ताने जाणारे बहुतेक नागरिक ठाणे आयुक्तालय क्षेत्रात राहतात. त्यामुळे सध्या असलेल्या पोलीस बळातून कायदा-सुव्यवस्था आणि चोख सुरक्षा व्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान आयुक्त परमवीर सिंग यांच्यापुढे असणार आहे. याशिवाय, गेल्या काही वर्षांत सोनसाखळी चोरीच्या घटनांचा आलेख उंचावला असून या घटनांमुळे महिलावर्ग हैराण झाला आहे. यामुळे सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांना पायबंद घालून या गुन्ह्यात कार्यरत असलेल्या टोळ्यांना जेरबंद करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. या घटनांच्या पाश्र्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची घोषणा करणारे सिंग यांनी आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोनसाखळी चोरांना पकडण्यासाठी आंबिवलीतील इराणी वस्तीवर कोम्बिंग ऑपरेशन केले. यामुळे त्यांनी ही घोषणा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे.
असे असले तरी सोनसाखळी चोरांवर त्यांचा वचक निर्माण होईल का किंवा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांना पायबंद बसेल का, या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काळातच मिळतील. याशिवाय ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेतील वागळे आणि उल्हासनगर युनिटच्या लाचखोर अधिकारी आणि मटकाकिंग बाबू नाडर याने कोपरी पोलीस ठाण्यात शिरून घातलेला धुडगूस यामुळे ठाणे पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. ती सुधारण्याचे आणि पोलिसांची चांगली वेगळी ओळख निर्माण करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.
शहराच्या सुरक्षेसाठी उपाययोजना..
ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ आणि बदलापूर आदी शहरांत महापालिका आणि नगरपालिकांच्या माध्यमातून सी.सी. टीव्ही कॅमेरे बसविण्याचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे चौक आणि रस्त्यांवर सी.सी. टीव्ही कॅमेरे बसविण्याकरिता ठाणे पोलिसांनी संबंधित महापालिका आणि नगरपालिकांकडे पत्रे पाठविली आहेत. मात्र, अद्याप शहरात सी.सी. टीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. यामुळे महापालिका आणि नगरपालिकांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कॅमेऱ्यांची योजना प्रत्यक्षात उतरविण्याचे आव्हान आयुक्त सिंग यांच्या पुढे आहे.
वाहतुकीचे मोठे प्रश्न..
ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ आणि बदलापूर आदी शहरांत मोठमोठे गृह प्रकल्प राहिले असून या गृह प्रकल्पामध्ये नागरिक राहावयास आले आहेत. यामुळे शहरातील वाहनांच्या संख्येत वाढ झाली असून त्या तुलनेत सर्वच शहरांतील रस्ते वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अपुरे पडू लागले आहेत. काही रस्त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव राहिलेला नाही. असे असतानाच दररोज नवीन वाहनांची संख्या वाढत आहे. यामुळे शहरातील वाहतूक समस्या आणखी बिकट होऊ लागली आहे. परंतु, शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेत जेमतेम पाचशे अधिकारी – कर्मचारी आहेत. त्यापैकी शंभर कर्मचारी कोर्ट आणि इतर कारकुनी कामांत व्यस्त असतात. मुंबई शहरातील वाहतूक शाखेत सुमारे अडीच ते तीन हजार कर्मचारी कार्यरत आहेत. मुंबईतील वाहने ठाणे किंवा नवी मुंबई शहरातून ये-जा करतात. पण, मुंबईच्या तुलनेत २० टक्के वाहतूक पोलीस नाहीत. यामुळे लोकसंख्येच्या मानाने कमी असलेल्या वाहतूक शाखेचे मनुष्यबळ वाढवून शहरातील वाहतूक समस्या सोडविण्याचे मोठे आव्हान सिंग यांच्यापुढे आहे.