ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाशी संगनमत करून भाजपने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी केला. या आरोपानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “असा त्यांचा कट होता, अन् झालेही तसेच, असा आरोप त्यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका करत मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे सांगत काही कागदपत्रेही सादर केली. केंद्रीय निवडणूक आयोगाशी संगनमत करून भाजपने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी केला.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २५ जागा केवळ ३३ हजारांच्या मताधिक्याने जिंकल्या आणि या जागांमुळेच मोदी सत्तेवर टिकून राहिले, अशी टीका त्यांनी केली. यावरून आता सत्ताधारी पक्षाकडून त्यांच्यावर टीका होत आहे तर, विरोधी पक्षांतील नेत्यांकडून करण्यात आलेल्या आरोपांचे समर्थन करण्यात येत आहेत. अशाचप्रकारे त्यांच्या आरोपांचे समर्थन करणारी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सोशल मीडियावर केली आहे.

निवडणूक आयोगाचाच त्यात सहभाग होता

पहिले निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यात आले, त्यांचे नाव होते राजीव. ते भाजपचे बोलके बाहुले म्हणूनच काम करीत होते. या नंतरच महाराष्ट्रातील सरकार पडले. सरकार पाडण्यास जबाबदार असलेल्या आणि पक्ष स्वतःचा असल्याचा दावा करणाऱ्यांना सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी निवडणूक आयोगाने ( Election Commission ) पार पाडली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जो घोटाळा झाला, त्यामध्येही निवडणूक आयोगाचाच त्यात सहभाग होता. याची खरी सुरूवात जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलून घेतला, तेव्हाच झाली होती. याचाच अर्थ हे प्लॅनिंग कधीपासून झाले अन् हा वोट चोरीचा कट कधीपासून रचला होता, याचा विचार आता जनतेनेच करावा, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

असा त्यांचा कट होता, अन् झालेही तसेच

निवडणूक मतदान घोटाळा अर्थात वोट चोरी या प्रकरणाची सुरूवात मुख्य निवडणूक आयोगाची निर्मिती कशी व्हावी, हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आताच्या सत्तारूढ पक्षाने लोकसभेत फिरवून घेतला. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, जर निर्वाचन आयोगाला पक्षाभिनिवेशापासून दूर ठेवायचे असेल, पक्षपाती कामापासून त्यांना रोखायचे असेल तर निवडणूक आयुक्तांची निवड करताना जी समिती नियुक्ती केली जाणार आहे. त्या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असावा.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर संविधानाला पायदळी तुडविणाऱ्या या सरकारने सदरचा निर्णय लोकसभेत बदलून घेतला आणि सरन्याधीशांना त्या समितीच्या बाहेर काढून त्या जागी आणखी एक मंत्री असावा, असा निर्णय करून घेतला. त्यामुळेच आपल्याला हवा तो निवडणूक आयुक्त आणता येईल, असा त्यांचा कट होता, अन् झालेही तसेच, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

चोरी तर सिद्ध झालीच आहे

चोर चोरी लपवण्यासाठी धावपळ करतोय. राहुल गांधी यांच्या काल झालेल्या पत्रकार परिषदेनंतर लोकांची वाढलेली उत्सुकता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहार या राज्याच्या मतदार याद्याच वेबसाईटवरून गायब करून टाकल्या. किंबहुना, त्या वेबसाईटपर्यंत आता पोहचताच येत नाही. चोराने चोरी केली आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. आता चोर कुठेही लपला किंवा चोराने कितीही लपवालपवी केली तरी काय फरक पडतो? चोरी तर सिद्ध झालीच आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.