बदलापूरः कल्याण बदलापूर दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या उभारणीच्या कामात आड येणारी १०६ झाडे हटवली जाणार आहेत. त्यासाठी स्थानिक नगरपालिकांना मुंबई रेल्वे विकास मंडळाकडून निधीचे वितरणही करण्यात आले आहे. बदलापूर शहरात ४१, अंबरनाथ शहरात ६५ तर उल्हासनगर शहरात इतकी झाडे हटवली जाणार आहेत. त्यांच्या पुनर्रोपणासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिकेने याची यादी जाहीर केली असून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या आहेत.

मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या टप्पा तीन अ मधील या कल्याण बदलापूर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम ३० टक्के पूर्ण झालेले आहे. सुमारे १ हजार ५०१० कोटी रूपये खर्चातून हा प्रकल्प मार्गी लावला जातो आहे. यात पाच स्थानके आणि ५१ पुलांचे काम केले जाणार आहेत. काही उड्डाणपुलांची कामे सुरू असून काही पूर्ण करण्यात आली आहेत. विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथे बांधकामे सुरू आहेत. विठ्ठलवाडी स्थानकातील फलाटांची लांबी वाढवण्याचे कामही सुरू आहे. याच टप्प्यात चिखलोली स्थानकाची निर्मिती, त्यासाठी टाकल्या जाणाऱ्या रेल्वे मार्गिका, त्यांचे विद्युतीकरण अशीही कामे यात समाविष्ट आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून काम सुरू असले तरी याचा वेग संथगतीने असल्याचा आरोप होतो आहे. त्यामुळे या मार्गाच्या उभारणीसाठी वेगाने पाऊले उचलण्याची मागणी होत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्गाच्या उभारणीत काही घरे, खासगी जागा आणि झाडांचा अडथळा होता. त्या घरांना हटवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. तर झाडांना हटवण्यासाठी आता पालिकांना प्रक्रिया सुरू केली आहे. शुक्रवारी कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने नगरपालिका हद्दीतील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या आड येणाऱ्या झाडांना हटवण्याबाबत सूचना जाहीर केली. त्यानुसार कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतून जाणाऱ्या तिसऱ्या चौथ्या मार्गिकेत ४१ झाडे बाधीत होत आहेत. या झाडांना हटवून त्यांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. यामध्ये विलायची चिचं, आंबा, शिवन, रेनट्री, पिंपळ, कदंब, पिचाकारी, गुलमोहर, चारकोल, काशीद, उंबर, सुभाबूल अशी अनेक झाडे आहेत. या झाडांना हटवून त्यांचे पुनर्रोपण करण्याबाबत कुणालाही हकरत असल्यास ७ दिवसांच्या आत सूचना व हरकती मांडण्याचे आवाहन कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने केले आहे. या कामासाठी पालिकेने एक कोटींचा निधी पालिकेला दिला आहे, अशी माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी दिली आहे. तर अंबरनाथ नगरपालिका हद्दीत एकूण ६५ झाडे बाधीत होत आहेत. त्यासाठी मुंबई रेल्वे विकास मंडळाने पालिकेला १ कोटी ७५ लाखांचा निधी दिला आहे. मात्र या सर्व प्रक्रियेनंतर पुनर्रोपण झालेली झाडे जगली पाहिजेत, अशी आशा पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.