डोंबिवली : टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरूणीचा राहत्या घरात खून करून पळून गेलेल्या ठाकुर्लीतील ४२ वर्षाच्या इसमाला कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथील गणेशघाट भागातून शिताफिने अटक केली. त्याने तरूणीच्या खुनाची कबुली गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिली आहे.सुभाष श्रीधर भोईर (४२, रा. सर्वोदय स्नेह इमारत, ठाकुर्ली) असे अटक आरोपी इसमाचे नाव आहे. टिळकनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी एका तरूणीचा राहत्या घरात खून झाल्याची तक्रार मयत तरुणीच्या नातेवाईकांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. याप्रकरणाचा तपास कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुरू केला होता.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी सांगितले, आरोपी सुभाष श्रीधर भोईर हा तरूणीसोबत तीन वर्षापासून ठाकुर्लीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्यांच्यात मागील काही महिन्यांपासून किरकोळ विषयांवरून वाद सुरू होते. खुनाच्या पाच दिवस अगोदर सुभाष आणि तरूणीमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून सुभाषने राहत्या घरात प्रेयसीचा गळा आवळून खून केला.या घटनेनंंतर सुभाष प्रकरण अंगलट येईल या भीतीने घरातून पळून गेला. या घटनेची माहिती तरूणीच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.या गुन्ह्याचा तपास कल्याण गु्न्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, हवालदार विलास कडू, सुधीर कदम, विजय जिरे, सचिन भालेराव, प्रवीण किणरे, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे यांनी सुरू केला होता.

तरूणीचा मारेकरी कल्याणमधील दुर्गाडी किल्ला भागातील गणेशघाट भागात बुधवारी दुपारी येणार आहे. तेथून तो पसार होणार आहे, अशी गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पथकाने तात्काळ त्या भागात सापळा लावला. ठरल्या वेळेत सुभाष भोईर त्या भागात येताच पथकाने त्याच्यावर झडप घातली. या खुनाचा कोणताही धागादोरा नसताना पोलिसांनी तांत्रिक कौशल्याच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. सुभाषने तरुणीच्या खुनाची कबुली पोलिसांना दिली आहे. त्याचा ताबा टिळकनगर पोलिसांना देण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक शिंदे यांनी दिली.

करोनात ओळख

ठाकुर्लीतील राहणाऱ्या सुभाष भोईर याच्या पत्नीचे निधन झाले. खून झालेली परिचारिका पतीपासून विभक्त राहत होती. तरूणी एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून नोकरी करत होती. करोना महासाथीच्या काळात मयत तरुणी आणि सुभाष यांच्यात ओळख झाली होती. त्यानंतर ते लिव्ह इन रिलेशनमध्ये ठाकुर्ली भागात राहत होते. या दोघांनी मुले असल्याचे सुत्रांकडून समजते.