राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा जिल्ह्यांमध्ये देखील मोठ्या संख्येने करोना रुग्ण आढळून येत आहेत. ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगर पालिकेमध्ये देखील करोनाची रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढून आल्याचं आढळून आलं होतं. नागरिकांकडून करोनासंदर्भातल्या नियमांचं उल्लंघन, लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी लग्नसमारंभांना झालेली गर्दी अशा काही कारणांमुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं सांगितलं गेलं. गेल्या २४ तासांचा विचार करता कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रामध्ये २२५ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मात्र, त्यासोबतच एकूण ५२८ रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत. कल्याण आणि डोंबिवलीकरांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.

 

दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा आकडा जरी एकूण सापडलेल्या नवा करोनाबाधितांपेक्षा जास्त असला, तरी मृतांचा आकडा कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेची चिंता कायम ठेवणारा ठरला आहे. आज दिवसभरात कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रामध्ये एकूण १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यघडीला कल्याण-डोंबिवलीमध्ये एकूण ४ हजार ७०० रुग्ण करोनाचे उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत महानगरपालिका क्षेत्रामध्ये १ लाख २४ हजार ११९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

आज सापडलेल्या रुग्णांची विभागनिहाय आकडेवारी!

कल्याण पूर्व – ११
कल्याण पश्चिम – २५
डोंबिवली पूर्व – ८९
डोंबिवली पश्चिम – ८७
मांडा टिटवाळा – ९
मोहना – ४

दरम्यान, कल्याणमध्ये लसीचा पुरेसा साठा न आल्यामुळे उद्या म्हणजेच १९ मे रोजी कल्याणमध्ये लसीकरण बंद राहील, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

पुण्यात एकाच दिवसात १ हजार ०२१ नवे करोनाबाधित!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे पुण्यात २४ तासांत १ हजार ०२१ नवे करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या ४ लाख ६१ हजार ००८ इतकी झाली आहे. त्याचवेळी आज दिवसभरात पुण्यात ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा देखील वाढून ७ हजार ७९५ इतका झाला आहे. २४ तासात पुण्यात २ हजार ८९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत अशा डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ४ लाख ३६ हजार ६९० इतकी झाली आहे.