कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेतील २१ संवर्गातील ४९० पदांसाठी सरळसेवेने नोकर भरती करण्यात येणार आहे. या नोकर भरतीसाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या समन्वयाने टीसीएस कंपनीकडून एक लेखी परीक्षा ९ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. ही परीक्षा राज्यातील १४ जिल्ह्यांमधील २५ परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी पालिकेचे ४२ समन्वयक आणि निरीक्षक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
आयुक्त अभिनव गोयल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणाऱ्या परीक्षेत मुख्य समन्वय अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड काम पाहणार आहेत. आयुक्त गोयल यांच्या निर्देशाप्रमाणे ४२ समन्वयक अधिकारी आणि निरीक्षक या परीक्षा केंद्रांवर नियुक्त करण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रांवर सकाळी नऊ ते दुपारी ११, दुपारी एक ते दुपारी तीन आणि संध्याकाळी पाच ते संध्याकाळ सात या वेळेत अशा तीन सत्रांत ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी राज्याच्या विविध भागातून एकूण सुमारे ५५ हजाराहून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात समन्वयक अधिकारी म्हणून संदीप तांबे यांची नियुक्ती केली आहे. कोटकर इन्फोसिस्टम याठिकाणी परीक्षा केंद्र आहे. नाशिक येथे कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे समन्वयक अधिकारी. याठिकाणचे परीक्षा केंद्र भुजबळ नाॅलेज सिटी, पुणे विद्यार्थी गृह काॅलेज येथे आहे. नांदेड येथे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे समन्वयक अधिकारी, एसएसएस इन्स्टिट्युट विष्णुपुरी, राजीव गांधी काॅलेज येथे केंद्र आहे. नागपूर येथे कार्यकारी अभियंता प्रवीण पवार समन्वयक अधिकारी आहेत. आयाॅन डिजिटल, सेंट्रल इंडिया नर्सिंंग, आकार काॅलेज याठिकाणी परीक्षा केंद्रे आहेत.
अमरावती येथे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत समन्वयक अधिकारी, याठिकाणचे परीक्षा केंद्र आयाॅन डिजिटल झोन येथे आहे. कोल्हापूर येथे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे समन्वयक अधिकारी आहेत. याठिकाणचे परीक्षा केंद्र शिये आयाॅन डिजिटल झोन येथे आहे. जळगाव येथे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, उज्जवला प्रायव्हेट आयटीय, ऑनलाईन परीक्षा केंद्र, जळगाव विद्यापीठ येथे केंद्र आहे. अहिल्यानगर येथे नगररचनाकार शशिम केदार समन्वयक अधिकारी, अचिव्हर्स इन्फोटेक येथे परीक्षा केंद्र आहे.
पुणे येथे उपायुक्त प्रसाद बोरकर समन्वयक अधिकारी आहेत. रामटेकडी येथील आयाॅन डिजिटल झोनमध्ये परीक्षा केंद्र आहे. नवी मुंबईत उपायुक्त कांचन गायकवाड समन्वयक अधिकारी आहेत. याठिकाणचे केंद्र वायएमटी काॅलेज खारघर येथे आहे. रायगडचे समन्वयक अधिकारी शैलेश कुलकर्णी आहेत. मोहपाडा पील्लई एचओसी कॅम्पस येथे परीक्षा केंद्र आहे. मुंबई जिल्ह्याचे समन्वयक अधिकारी मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव आहेत. ठाकुर इन्स्टिट्युट, कांदिवली, जीएनव्हीएस संस्था, शीव, आयाॅन डिजिटल, पवई याठिकाणी परीक्षा केंद्रे आहेत.
दत्तात्रय पाटील, गजानन पाटील, जितेंद्र सोनावणे, संतोष धांडे, राहुल म्हात्रे, जितेंद्र पाटील, ज्ञानेश्वर आडके, आदिनाथ पोखरकर,अवधूत मदन, दिलीप शिंदे, तुषार साठे, अजय सुळेभावीकर, राजेंद्र वसईकर, उदय सूर्यवंशी, देवेंद्र एकांडे असे २९ अधिकारी निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.