डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग क्षेत्रातील देवीचापाडा परिसरातील जगदांबा माता परिसरातून भरत भोईर नाला वाहतो. या नाल्यावर चेंबरचे झाकण नव्हते. मुसळधार पावसामुळे नाला दुथडी वाहत होता. रविवारी रात्री साडे दहा वाजता मुलांसोबत खेळत असताना जगदांबा परिसरातील एक १३ वर्षाचा शाळकरी मुलगा नाल्यावरील उघड्या झाकण्याच्या छिद्रातून नाल्यात पडून वाहून गेला.

स्थानिक रहिवासी आणि कल्याण डोंबिवली पालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून या बेपत्ता मुलाला रात्रीच नाल्यातून बाहेर काढले. त्याला तातडीने पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला डाॅक्टरांनी मृत घोषित केले.

आयुष कदम (१३) असे मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे. तो देवीचापाडा जगदांबा माता परिसरातील शांताराम निवासमध्ये आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. तो स्वामी विवेकानंद शाळेच्या अरूणोदय शाखेत इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त केली आहे. रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. जगदांबा माता परिसराच्या बाजुला नाल्यालगत असलेल्या भागात परिसरातील मुले रात्री दहा वाजता खेळत होती. खेळत असताना नाल्यावरील उघडे झाकण आयुषच्या निदर्शनास आले नाही.

तो अचानक खेळकरी मुलांच्या समोरून नाल्यावरील उघड्या छिद्रातून थेट नाल्यात पडला. मुलांनी ओरडा केला. एका नागरिकाने नाल्यात उडी मारून आयुषला वाचविण्याचा प्रयत्न केला. नाल्यातील वेगवान प्रवाहामुळे तो हाती लागला नाही. तातडीने ही माहिती पालिका अग्निशमन विभाग गरीबाचापाडा विभागाला देण्यात आली. जवानांंनी तातडीने घटनास्थळी येऊन नाल्याच्या खाडी मुखाजवळ जाळी आडवी लावली. प्रखर झोतामधून बेपत्ता मुलाचा शोध सुरू केला. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे घटनास्थळी आले.

एक तासाने आयुषचा मृतदेह पाण्यावर तरंगला. अग्निशमन जवानांनी त्याला बाहेर काढले. त्याला स्थानिकांनी तात्काळ पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकाराने स्थानिक आणि उत्सव आयोजक यांच्यामध्ये रात्री उशिरापर्यंत वाद सुरू होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चोपडे, सामाजिक कार्यकर्ते बाळा म्हात्रे, मनोज वैद्य, विजय भोईर आणि इतरांनी पुढाकार घेऊन रहिवाशांना शांत केले.

नाल्यावरील झाकण सुस्थितीत आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी पालिकची आहे. पालिका अधिकाऱ्यांचे या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष नसल्याने या मृत्युप्रकरणाला जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या भागात एक जल्लोषात नवरात्रोत्सव उत्सव सुरू आहे. या ठिकाणच्या भोजन भंडारा प्रसादाच्या पत्रावळी, खरकटे या नाल्यावरील चेंबरमधून नाल्यात टाकले जात होते, अशी या भागात चर्चा सुरू आहे. आयुषच्या मृत्युमुळे स्थानिक रहिवासी खूप संतप्त झाले होते. विष्णुनगर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. संतप्त रहिवाशांमुळे या भागातील नवरात्रोत्सवातील भंडारा भोजन सोमवारी बंद ठेवण्यात आले. या उत्सवाकडे येणाऱ्या भाविकांची वर्दळ सोमवारी पूर्ण बंद झाली होती.