कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागातील भूमापक बाळू बहिराम, आरेखक राजेश बागुल यांना प्रशासनाने बुधवारी पालिका सेवेतून निलंबित केले. इमारत बांधकाम आराखड्यात फेरफार केल्या प्रकरणाच्या गुन्ह्यात ४८ तासाहून अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्याने आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून प्रशासनाने महाराष्ट्र नागरी सेवा व गैरवर्तवणूक अधिनियमाने ही कारवाई केली आहे.
गेल्या आठवड्यात बहिराम, बागुल यांना बाजारपेठ पोलिसांनी बनावट मोजणी नकाशा प्रकरणात अटक केली होती. ते तीन दिवस पोलीस कोठडीत होते. सोमवारी त्यांना कल्याण व जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले. या प्रकरणात तत्कालीन नगररचनाकार राजेश मोरे, कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर मोरे, निवृत्त साहाय्यक संचालक मारूती राठोड यांची कसून चौकशी करण्याच्या मागे पोलीस आहेत.
राठोड यांचा अमरावती, पुणे येथील पत्त्याच्या शोधात पोलीस आहेत. एक कर्मचारी मुलुंड तर एक डोंबिवली पश्चिमेत मोठागाव भागात राहतो. चौकशीच्या फेऱ्यातील कर्मचारी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, आरोपींवर अजामीनपात्र कलमे पोलिसांनी लावली आहेत. त्यामुळे त्यांना जामीन मिळणे कठीण आहे, असे पोलीस आणि कायद्याचे अभ्यासक सांगतात. या सगळ्या प्रकारामध्ये काही विकासक, वास्तुविशारद अस्वस्थ असल्याचे समजते. या प्रकरणातील वास्तुविशारद, विकासकावर पोलिसांनी कारवाई सुरू करावी, अशी मागणी तक्रारदार रमेश पद्माकर म्हात्रे यांनी केली आहे.