कल्याण – बुधवारी रात्री कल्याण जवळील मोहने गावात फटाके विक्रेता आणि एक फटाके वाजविणारा यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर दोन गटातील तुफान राड्यात झाले. यामध्ये दोन्ही गटातील तरूण गंभीर जखमी झाले. खडकपाडा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी अनर्थकारी घटना टळली. पोलिसांनी या दोन्ही गटांविरुध्द परस्पर विरुध्द गुन्हे दाखल केले आहेत.

साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी सांगितले, मोहने येथे फटाके विक्रीसाठी मंच उभारण्यात आले आहेत. एका फटाके विक्री दुकानाजवळ एक तरूण फटाके फोडत होता. त्यावेळी फटाके विक्रेत्याने त्या तरूणाला तू येथे फटाके वाजवू नकोस. फटाक्यांच्या दुकानात फटाका उडून आग लागेल. एवेढ सांगुनही फटाके वाजविणारा तरूण काहीही ऐकण्यास तयार नव्हता. अखेर फटाके विक्रेता आणि फटाके वाजविणारा यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी दोन्ही विक्रेत्याचे साथीदार आणि फटाके वाजिवणाऱ्या तरुणाचे साथीदार एकमेकांना भिडले. त्यांच्यात हाणामारी झाली. यामध्ये अनेक जण जखमी झाले.

यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर दगड, विटा फेकून एकमेकांवर हल्ले करून जखमी करण्याचा प्रयत्न केला. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी येऊन उपस्थित तरूणांची धरपकड केली. जखमींना तात्काळ पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काहींना उपचार करून सोडण्यात आले आहे. या जखमींची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे, असे साहाय्यक पोलीस आयुक्त घेटे यांनी सांगितले.

मोहने, आंबिवली परिसरात अंमली पदार्थांची अधिक प्रमाणात तस्करी केली जाते. हे बेकायदा धंदे बंद करावेत म्हणून स्थानिकांची पोलिसांकडे मागणी आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांना या भागातील नागरिकांनी यापूर्वी निवेदन दिले आहे.

मोहने येथील बुधवारी रात्रीच्या वादात काही तरूणांबरोबर अंमली पदार्थ सेवन करणारेही सहभागी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा वाद अधिक पेटल्याची चर्चा आहे. या हल्ल्यांमध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले तरूण सहभागी झाल्याची चर्चा आहे. पोलिसांनी मोहने परिसरातील घटना घडलेल्या भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासून संबंधित तरूणांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन दिवाळी सणाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याने या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी खडकपाडा पोलिसांना सूचना केल्या आहेत.