कल्याण : कल्याण शिळफाटा रस्त्यावरील काटई-निळजे रेल्वे पुलावरील उड्डाण पुलाचे साध्या पध्दतीने उद्घाटन शुक्रवारी सकाळी शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेप्रमाणे उरकून घेतले. या पुलाचे उद्घाटन होऊन काही तास उलटत नाहीत, तोच मनसेचे राजू पाटील यांनी टविटरच्या (एक्स) माध्यमातून पायाभूत सोयीसुविधांचे (इन्फ्रास्ट्रक्चर मॅन) विकास पुरूष म्हणून ओळखले जाणाऱ्या शिंदे शिवसेनेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले.
भैय्याजी, आमचा काटई निळजे नवीन उड्डाण पूल ठीक आहे ना. तात्याबा (गांडाभाई) त्यात काही गडबड नाही ना, असे प्रश्न करून मनसे नेते, माजी आमदार राजू पाटील यांनी खासदार शिंदेंसह समर्थकांना समाज माध्यमातून लक्ष्य केले आहे. कल्याण शिळफाटा रस्त्यावरील वाढती वाहन संख्या वाहून, प्रवाशांना होणारा त्रास विचारात घेऊन आपल्यासह अनेक जण पलावा चौक भागात पुलाच्या उभारणीची मागणी करत होते.
या मागणीप्रमाणे २०१९ मध्ये शासनाने पलावा चौक भागातील काटई निळजे रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलाला मंंजुरी दिली. त्यानंतर भूमिपूजन होऊन हे काम सुरूही झाले. हे काम अतिशय संथगतीने करण्यात आले. त्यामुळे जे काम दीड ते दोन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते, ते काम पूर्ण होण्यास सात वर्ष लागली. पुलाच्या या रखडपट्टीमुळे या पुलाच्या कामाच्या गुणवत्तेची चौकशी करावी अशी मागणी आपण एमएमआरडीएकडे केली आहे. आपल्या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही. आणि रेटून हे काम पूर्ण करण्यात आले.
दररोज शेकडो वाहने पलावा चौकातील काटई निळजे उड्डाण पुलावरून धावणार आहेत. त्यामुळे पूल गुणवत्तेत योग्य आहे की नाही हे पण महत्वाचे आहे. याचा कोणताही विचार न करता स्वताला इन्फ्रास्ट्रक्चर मॅन (विकास पुरूष) म्हणून घेणाऱ्यांनी नवीन पूल उद्घाटनाचा कोणताही गाजावाजा न करता आपल्या समर्थकांकरवी घाईत पुलाचे उद्घाटन करून पूल वाहतुकीसाठी खुला केला.
प्रवाशांनी तेवढ्या वेळेपुरते समाधान व्यक्त केले. आम्ही पूल सुरू करणारे समाधान पावले. घोषणा देऊन निघून गेले. पण, उद्घाटन करणाऱ्यांची पाठ फिरताच आम्ही पूल खुला केला म्हणून गावाला सांगत असतानाच, इकडे नवीन कोरा काटई निळजे पूल वाहतुकीसाठी रस्ता रोधक लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नक्की काय गोंधळ आहे. भैय्याजी, आमचा पूल ठीक आहे ना. तात्याबा (गांडाभाई) प्रवासी पुलावरून जातात. उगाच काही गडबड नको हं, असे राजू पाटील यांनी उपरोधिकपणे आपल्या विरोधकांना सुनावले आहे.
पुलाचे उद्घाटन केल्यानंतर शिंदे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी मनसे नेते राजू पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याची परतफेड काही तासात राजू पाटील यांनी केली आहे. त्यामुळे पुलावरून पुन्हा शिंदे शिवसेना, मनसेमध्ये जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.