Ganeshotsav 2025: कल्याण – कल्याण पश्चिमेतील वडवली कोळीवाडा गावात पारंपारिक पध्दतीने मंगळवारी सात दिवसांचे गणपतीचे विसर्जन करण्यात आले. गावातील मागील अनेक वर्षांची पूर्वजांनी सुरू केलेली डोक्यावरून गणपती विसर्जनासाठी नेण्याची परंपरा आताही गावातील नवीन पीढीने पाळली आहे. गावातील एका टोकापासून वाजतगाजत गणपती मिरवणूक काढली जाते. गावाच्या शेवटच्या टोकावरील गणपती घेऊन ग्रामस्थ एका वेळी गावाबाहेर पडतात. आणि उत्साहाच्या वातावरणात उल्हास नदीत गणपतीचे विसर्जन केले जाते.
ग्रामस्थांना सुस्थितीतपणे उल्हास नदीवर गणपतीचे विसर्जन करता यावे म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी गाव परिसरात कृत्रिम तलावांचीही चांगली व्यवस्था केली आहे. काही गणेश भक्तांनी या तलावांमध्ये तर काहींनी उल्हास नदीवर जाऊन गणपतीचे विसर्जन केले. वडवली कोळीवाडा गावच्या वेशीवर साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी गावातून गणपती डोक्यावर घेऊन निघालेल्या गणपती भक्ताचे गुलाब पुष्प देऊन पालिकेतर्फे स्वागत केले.
डोक्यावरून गणपती घरी प्राणप्रतिष्ठेसाठी आणण्याची, डोक्यावरून विसर्जनासाठी नेण्याची परंपरा गाव खेड्यांमध्ये, शहरी भागात लोप पावत चालली आहे. आता प्रत्येक गणेशभक्त आपल्या मोटारीत गणपती मूर्ती ठेऊन आपल्या कुटुंबीयांसह विसर्जनासाठी निघून जातात. ग्रामीण भागात ग्रामस्थ टेम्पो, मोटारीत गणपती ठेऊन गाव परिसरातील नदी, ओढ्यावर गणपती विसर्जनासाठी घेऊन जातात. यापूर्वीच्या काळात ग्रामस्थ भजन गात, वाजत नाचत गावातील गणपती डोक्यावर घेऊन एका रांगेत विसर्जनासाठी जात होते. ही प्रथा आता बंद पडत चालली आहे.
परंतु, कल्याण शहरी भागाजवळ असुनही वडवली कोळीवाडा गावाने मात्र आपल्या पूर्वजांनी सुरू केलेली डोक्यावरून गणपती मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जाण्याची प्रथा आताही जोपासली आहे. वडवली गावातील प्रत्येक गावातील रहिवाशाकडे मोटार आहे. परंतु मोटारीतून गणपती न नेता डोक्यावरून गणपती नेण्याची गावातील प्रथा आताही कायम आहे. गावच्या एका टोकापासून गणपती विसर्जन मिरवणूक सुरू होते.
गणपती असलेल्या घरातील गणपती आरती करून विसर्जन रांगेत सहभागी होतो आणि त्याप्रमाणे मिरवणूक वाजता गाजत, भजन गात गावच्या वेशीवर येतो. महिला, लहान मुले या मिरवणुकीत सहभागी होतात. यानिमित्ताने संपूर्ण गाव एकत्र येतो. एक वेगळा उत्साह आनंद असतो, असे वडवली कोळीवाडा गावचे रहिवासी आणि शिंदे शिवसेनेचे युवा सेना प्रमुख वैभव दुर्योधन पाटील यांनी सांगितले. पालिकेने विसर्जन स्थळांची उत्तम सोय केली आहे, असे त्यांनी सांगितले.
आमच्या पूर्वजांनी गावातील गणपती डोक्यावर घेऊन विसर्जनासाठी जाण्याची प्रथा आम्ही आताही पाळली आहे. कोणीही रहिवासी मोटारीने गणपती विसर्जनासाठी घेऊन जात नाही. गणपतीला निरोप देण्यासाठी गाव एकवटल्याचे चित्र दरवर्षी या मिरवणुकीच्या माध्यमातून पाहण्यास मिळते. – वैभव पाटील, रहिवासी, वडवली कोळीवाडा.
वडवली गाव हद्दीत गणपती विसर्जनासाठी नदी काठी उत्तम व्यवस्था केली आहे. काही गणेशभक्त पूर्वप्रथेप्रमाणे नदीत, काही कृत्रिम तलावात गणपती विसर्जन करतात. पालिकेतर्फे गुलाब पुष्प देऊन गणपती भक्तांचे स्वागत करण्यात आले. – प्रमोद पाटील, साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग.