कल्याण – कल्याण डोंबिवली शहरांतर्गत कल्याण डोंबिवली परिवहन सेवेच्या बस दिलेल्या वेळेत धावत नसल्याने, या बसवर अवलंबून असलेले प्रवासी बहुतांशी केडीएमटीच्या बस थांब्यावर थांबत नाहीत. अनेक प्रवासी रिक्षा, इतर वाहनांनी इच्छित स्थळाचा प्रवास करतात. त्यामुळे केडीएमटीच्या बस थांब्यावर बसची वाट पाहत प्रवासी थांबत नसल्याने शहराच्या विविध भागात आकर्षक सजावटीचे केडीएमटीचे बस थांबे भटके श्वान, गर्दुल्ले आणि वाहनांच्या विळख्यात अडकले आहेत.
कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाने लाखो रूपये खर्च करून कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांमध्ये बस थांबे उभारले आहेत. जुने बस थांबे चांगले असताना नवीन बस थांबे बसवायचे आहेत, असे सांगून दोन ते तीन वर्षापूर्वी शहरात स्टीलचे आकर्षक बस थांबे उभारण्यात आले. हे बस थांबे फक्त बस चालकासाठी बस थांब्याचा इशारा म्हणून उभे करण्यात आले आहेत. या बस थांब्यात उभे राहिले की पाऊस, उन अंगावर येते. कोणत्याही प्रकारचा निवारा या बस थांंब्याच्या माध्यमातून मिळत नाही, असे प्रवासी सांगतात.
काही ठिकाणी या बस थांब्याच्या खाली उंदरांनी उकिरडे काढले आहेत. काही ठिकाणी भिकारी, गर्दुल्ले आपले सामान त्या ठिकाणी ठेवतात. काही ठिकाणी भंगार विक्रेते आडोसा म्हणून या बस थांब्यांचा वापर करत आहेत. केडीएमटीचे तिकीट निरीक्षक शहर परिसरात फिरताना दिसत नाहीत त्यामुळे बस थांब्याची असलेली अवस्था प्रशासनाला कळत नसल्याचे समजते. यापूर्वीचे केडीएमटीचे साहाय्यक आगार व्यवस्थापक संदीप भोसले आठवड्यातून दोन ते तीन वेळा शहराच्या विविध भागात बस थांबे, परिवहन मार्ग यांची पाहणी करत होते. तिकीट तपासणीस नियमित तिकीट तपासणी करतात की नाही याचा आढावा घेत होते. हे प्रकार आता थंडावले असल्याची कर्मचाऱ्यांची चर्चा आहे.
डोंबिवली पूर्वेत पाथर्ली शेलार नाका भागात मुख्य वर्दळीच्या चौकात रस्त्याच्या दुतर्फा रिक्षा, टेम्पो उभे असतात. या भागातील केडीएमटीचा बस थांबा समोरील बाजुने पूर्णपणे वाहनांच्या विळख्याने झाकला गेला आहे. बस थांबा आणि बाजुच्या रिक्षा, इतर वाहनांमध्ये या भागात रात्रीच्या वेळेत गैरप्रकार चालतात, अशा तक्रारी आहेत. केडीएमटीचे बस थांबे प्रवाशांसाठी सुस्थितीत आहेत का याचा आढावा एकदा कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या अधिकाऱ्यांनी घेण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.