कल्याण – कल्याण पूर्वेतील द्वारलीपाडा येथे महसूल विभागाची तीन एकर गुरचरण जमीन आहे. या महसुली जमिनीतील २२ गुंठे क्षेत्र महसूल विभागाने कल्याण डोंबिवली पालिकेला जलकुंभ उभारण्यासाठी हस्तांतरित केले आहे. या जलकुंभाच्या जागेवर एका भूमाफियाने बेकायदा चाळी आणि गाळ्यांची बांधकामे केली होती. ही सर्व अतिक्रमणे आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने गुरूवारी भुईसपाट केली.
गुरचरण जमिनीवरील कल्याण डोंबिवली पालिकेच्या जलकुंभाच्या जागेवर बांधकामे करणारा द्वारलीपाडा येथील भूमाफिया जगदीश पाटील यांच्या विरूध्द महाराष्ट्र प्रांतिक नगररचना अधिनियमाने (एमआरटीपी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पूर्वेतील द्वारलीपाडा येथे मलंगगड रस्ता भागात महसूल विभागाची १२० गुंठे (तीन एकर) गुरचरण जमीन आहे. ही जमीन पडिक असल्याने या जमिनीवर भूमाफियांनी बेकायदा चाळी, व्यापारी गाळ्यांची बांधकामे केली आहेत. या बेकायदा चाळींमधील घरे गरजूंना विकून भूमाफियांनी त्यांची फसवणूक केली आहे. या बेकायदा चाळींच्या माध्यमातून माफियांनी शासनाचा लाखो रूपयांचा महूसल बुडविला आहे.
गुरचरण जमिनीतील एकूण १२० गुंठे क्षेत्रापैकी २२ गुंठे क्षेत्र महसूल विभागाने कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला द्वारलीपाडा येथे जलकुंभ उभारणीसाठी दिले आहे. कल्याण डोंबिवली पालिकेची २७ गाव परिसराला पाणी पुरवठा करणारी अमृत योजनेची कामे सुरू आहेत. द्वारलीपाडा येथे अमृत योजनेतून जलकुंभ उभारण्याचे पालिकेकडून प्रस्तावित आहे.
याठिकाणी जलकुंभ उभारणीचे काम पालिकेला सुरू करायचे आहे. परंतु, जलकुंभाच्या जागेत भूूमाफियांनी बेकायदा चाळी आणि त्याला संरक्षित भिंत उभारली होती. या बेकायदा बांधकामांमुळे पालिकेला याठिकाणी काम करणे शक्य होत नव्हते. भूमाफिया आपली बेकायदा बांधकामे वाचविण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांच्या कामात अडथळे आणत होते.
आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पाटील यांनी द्वारलीपाडा येथे जाऊन गुरचरण जमिनीची पाहणी केली. पालिकेचे २२ गुंठे जमिनीची त्यांनी पाहणी केली. त्यांना पालिकेच्या जलकुंभ क्षेत्रासह गुरचरण जमिनीवर अधिक प्रमाणात बेकायदा चाळींची बांधकामे झाल्याचे आढळले. साहाय्यक आयुक्त पवार यांनी तहसीलदार सचिन शेजाळ यांना पत्र लिहिले. या गुरचरण जमिनींवरील महसूल अधिपत्त्याखालील बेकायदा जमीनदोस्त करण्याची मागणी केली. पालिकेच्या जलकुंभ क्षेत्रावरील बेकायदा चाळी, संरक्षित भिंतीची बांधकामे पालिकेच्या तोडकाम पथकाने जमीनदोस्त केली. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्वाची मानली जात आहे.