ठाणे – पावसामुळे अनेक रस्त्यांची अवस्था गंभीर झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशातच कल्याण शहर आणि मुरबाडला जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था अधिक गंभीर झाली असून समाजमाध्यमांवर रस्त्याच्या अवस्थेवर रिल बनवत खिल्ली उडवली जात आहे. हा नॅशनल हायवे नव्हे तर चॉकलेट हायवे असल्याचे म्हटले जात आहे.
कल्याण शहरातून मुरबाडकडे जाण्यासाठी एक राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग पुढे नगरला जोडला जातो. नगर भागात जाण्यासाठी सर्वाधिक जवळचा मार्ग म्हणून मुंबई, ठाणे, रायगड भागातील वाहन चालक या रस्त्याला प्राधान्य देतात. तसेच जुन्नर भागातील भाजीपाला उत्पादक दररोज याच रस्त्याने कल्याणमध्ये येतात. कल्याण परिसरातून अनेक नोकरदार मुरबाड, किन्हवली, सरळगाव परिसरात प्रवास करतात. मात्र या रस्त्याची अवस्था गंभीर आहे.
या मार्गावरील काही भागांमध्ये, जसे की म्हारळ-कांबा परिसरामध्ये, रस्ता रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाची कामे संथगतीने सुरू आहेत. याचा फटका दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसतो. त्याचप्रमाणे कल्याण मुरबाड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असत. अशातच सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाल्याचे चित्र आहे.
समाजमाध्यमांवर मजेशीर पोस्ट
कल्याण मुरबाड रस्त्याचा प्रवास करत असताना अनेकदा धुळ, खड्ड्यांनी त्रस्त व्हायला होते. अशातच मागील काही दिवसांपासून पावसामुळे रस्त्यांची अवस्था गंभीर झाली आहे. धुळीवर पाणी पडल्याने चिखल झाला आहे. यावर मुरबाड-कल्याण रोड असे लिहून ‘नॅशनल हायवे’ यावर चुकीची खुणेचे चिन्ह देत ‘चॉकलेट हायवे’ लिहत त्या समोर बरोबरचे चिन्ह देण्यात आले. चिखलाच्या रस्त्याचा मजेशीर पोस्टने प्रवाशांचा रोजचा प्रवास मांडला आहे.
गाड्यांचाही अभाव
कल्याणहून मुरबाडकडे जाण्यासाठी अनेकदा नागरिकांना खुप वेळ वाट पाहावी लागते. वेळेवर बस आणि खाजगी गाड्या देखील उपलब्ध होत नाहीत अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. वाहतूक कोंडी आणि रस्त्यामुळे वेळेवर गाडी नसल्याचेही त्यांनी सांगितले.
