कल्याण – गेल्या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत कल्याण पश्चिमेतील खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीतील २५ नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले होते. या चोरीप्रकरणी नागरिकांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. खडकपाडा पोलिसांनी गुन्हे अहवाल तांत्रिक संकेतस्थळाच्या माध्यमातून या सर्व चोरीच्या मोबाईलचा शोध घेऊन ते सर्व मोबाईल २५ मोबाईल मालकांना परत केले. सुमारे साडे तीन लाखाहून अधिक किमतीचे हे मोबाईल होते.

खडकपाडा पोलीस ठाणे हद्द ही सामान्य, मध्यमवर्गीय वस्तीचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील अनेक नागरिक सकाळी, संध्याकाळी या भागात फिरण्यासाठी बाहेर पडतात. काही नोकरीनिमित्त सकाळी घराबाहेर पडतात. अशा नागरिकांना गाठून त्यांच्या हातामधील, पिशवीमधील मोबाईल चोरट्यांनी काढून पलायन केले होते. काही ज्येष्ठ नागरिक, वृध्द यांचेही मोबाईल चोरट्यांनी हातामधून हिसकावून पळून गेले होते.
गेल्या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत अशाप्रकारे मोबाईल चोरीच्या सुमारे २५ तक्रारी खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या.

मोबाईल चोरीच्या या वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांना विशेष शोध पथक तयार करून या मोबाईल चोरीच्या प्रकरणांचा तपास करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाप्रमाणे साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. वाघमोडे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांचे एक विशेष पथक तयार केले होते.

या पथकाने गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत नागरिकांच्या चोरून नेलेले, हरविलेल्या, गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेतला. पोलिसांजवळील गुन्हे शोध अहवाल तांत्रिक यंत्राच्या साहाय्याने हे मोबाईल शोधून काढण्यात आले. यामधील काही मोबाईल चोरट्यांनी व्यापारी, काही नागरिकांना कमी किमतीला विकले असल्याचे निदर्शनास आले. हे सर्व मोबाईल एकेक करून पोलिसांनी कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरातून ताब्यात घेतले.

या मोबाईलमधील तांत्रिक माहितीच्या आधारे आणि मोबाईलधारक तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीप्रमाणे खडकपाडा पोलिसांनी या मोबाईलची ओळख पटवली. आणि हे सर्व मोबाईल उपायुक्त झेंडे यांच्या सूचनेप्रमाणे बुधवारी २५ मोबाईलधारकांना खडकपाडा पोलीस ठाण्यात बोलावून जाहीर कार्यक्रमात साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. आपला हरविलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.