कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकातील एका स्टेशन मास्तरने अठरा वर्षापूर्वी बूट पाॅलिश करणाऱ्या कंत्राटदाराकडून दरमहा एक हजार रूपये लाचेची मागणी केली होती. या लाच प्रकरणाची माहिती ठेकेदाराने केंद्रीय अन्वेषण विभागाला दिली होती. स्टेशन मास्तरसाठी एक हजार रूपयांची लाच घेताना रेल्वेच्या एका पाॅईन्टसमनला सीबीआयने अटक केली होती. मागील अठरा वर्ष हा खटला सीबीआयकडून ठाणे येथील विशेष न्यायालयात सुरू होता.

ठाणे येथील सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. देशमुख यांनी याप्रकरणातील तक्रारदार, आरोपी स्टेशन मास्तर यांचे झालेले निधन आणि याप्रकरणात सबळ उपलब्ध नसल्याने लाच स्वीकारणाऱ्या पाॅईन्सटमनची निर्दोष मुक्तता केली.

अठरा वर्षापूर्वी कल्याण रेल्वे स्थानकात ओमप्रकाश तिपन्ना निन्ने या स्टेशन मास्तरनी बुट पाॅलिश ठेकेदाराकडे दरमहा एका हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच स्टेशन मास्तर ओमप्रकाश निन्ने यांच्यासाठी रेल्वेचा पाॅईन्सटमन शिवाजी श्रीपाल मशाल यांनी रेल्वे ठेकेदाराकडून स्वीकारली होती, असा आरोप होता. सीबीआयच्या सापळ्यात मशाल लाच घेताना सापडले होते. याप्रकरणी सीबीआयने लाच प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मागील अठरा वर्ष हा खटला ठाणे येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुरू होता.

कल्याण रेल्वे स्थानकात बुट पाॅलिश करण्याचे कंत्राट एका ठेकेदाराला मिळाले होते. या ठेकेदाराच्या नियंत्रणाखाली बुट पाॅलिश करणारे कामगार रेल्वे स्थानकात नियोजित ठिकाणी बसणार होते. हे बुट पाॅलिश नियमित कल्याण रेल्वे स्थानकात बसून बुट पाॅलिश करून पैसे कमविणार आहेत. त्यामुळे या बदल्यात आम्हालाही काही तरी पाहिजे या विचारातून रेल्वे स्थानक मास्तर ओमप्रकाश निन्ने यांनी बुट पाॅलिश कंत्राटदाराकडे दरमहा एक हजार रूपये लाच देण्याची मागणी केली होती. आम्ही विहित मार्गाने हे कंत्राट घेतले त्यामुळे दरमहा तुम्हाला पैसे देण्याचा प्रश्न येत नाही, असे ठेकेदाराने रेल्वे स्टेशन मास्तरला सांगितले होते. तरीही ते पैशाच्या मागणीवर अडून होते. बुट पाॅलिश ठेकेदाराने याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तक्रार केली.

२ मार्च २००७ रोजी रेल्वे स्टेशन मास्तरसाठी रेल्वेचे पाॅईन्सटमन शिवाजी मशाल बुट पाॅलिश ठेकेदाराकडून एक हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ सीबीआयच्या सापडळ्यात अडकले. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन मशाला यांना अटक झाली. सीबीआयकडून विशेष न्यायालयात याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाले होते. दरम्यान, या खटल्याच्या सुनावण्या सुरू असताना रेल्वे स्थानक मास्तर ओमप्रकाश निन्ने, तक्रारदार यांचे निधन झाले होते. हा खटला अंतीम सुनावणीसाठी आला त्यावेळी न्यायालयाने तपास यंत्रणेने पाॅईन्सटमन याने लाचेची केलेली आणि स्वीकारलेली रक्कम यामध्ये गंभीर त्रृटी ठेवल्या आहेत. याप्रकरणात सबळ पुरावे कुठे आहेत असे प्रश्न केले. तसेच रेल्व स्टेशन मास्तर यांच्या कार्यालयातील शिपाई रजेवर असल्याने त्या दिवशी मशाल त्या कार्यालयात हजर होते. याप्रकरणातील दोन साक्षीदार या घटनेविषयी गुन्हाला सबळ माहिती देऊ शकले नाहीत.

ही अतिशय गुंतागुंतीची केस झाल्याने सीबीआयने स्वताहून हा खटला मागे घ्यावा अशी सूचना केली. मशाला विरुध्द सबळ पुरावा नसल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.