ठाणे – कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक वाहन परवाना संबंधित कामकाजासाठी येत असतात. यामध्ये प्रामुख्याने शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती या दोन्ही सेवांसाठी मोठी मागणी असते. मात्र, सध्याच्या शिबिर कार्यालयांमध्ये वाहनचालकांना चाचणीसाठी वेळच उपलब्ध होत नसल्याने अनेक नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. लोकसंख्या वाढ, वाढलेली वाहनधारकांची संख्या आणि दिवसेंदिवस वाढणारी मागणी लक्षात घेता या शिबिरांमध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहिती कल्याण उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
लोकसंख्येची झपाट्याने वाढ, त्यानुसार वाढलेली वाहनधारकांची संख्या आणि नित्यनेमाने वाढणारी परवान्यांची मागणी लक्षात घेता परिवहन विभागाकडे मोठ्या प्रमाणात शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती या दोन्ही सेवांसाठी मोठी मागणी असते. मात्र यासाठी चाचणी देण्यासाठी मोठी यादी असते. यामुळे अनेक दिवस वाहनधारकांना आपला क्रमांक येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. नागरिकांना होणारा त्रास कमी करणे आणि परवाना सेवा अधिक कार्यक्षम बनवणे हा उद्देश ठेवून कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शिबिरांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन शिबिरांमुळे वाहन परवाना चाचणीसाठी अधिक वेळ उपलब्ध होणार असून अर्जदारांना त्यांच्या नियोजित तारखेलाच चाचणी देता येणार आहे. यामुळे प्रतीक्षेत कपात होईल, गोंधळ कमी होईल आणि नागरिकांना सोयीस्कर सेवा मिळेल. तसेच, परिवहन विभागाच्या दृष्टीने कामकाजाचा वेग वाढणार असून अर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक व परिणामकारक होईल. या बदलामुळे विशेषतः विद्यार्थी, नोकरीसाठी परवाना आवश्यक असणारे युवक तसेच महिला व वरिष्ठ नागरिक यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाढीव शिबिरांमुळे दररोज अधिकाधिक अर्जदारांना सुविधा उपलब्ध होणार असून, परवाना प्रक्रिया जलद आणि सुरळीत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कल्याण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अंबरनाथ, बदलापूर आणि मुरबाड अशी तीन शिबिर कार्यालये कार्यरत आहेत. या तिन्ही ठिकाणी नियमितपणे परवाना प्रक्रियेचे कामकाज पार पडते. मात्र दिवस मर्यादित असल्यामुळे आणि चाचणीसाठीचा दिवस मिळविण्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे अनेकांना परत जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर शिबिर कार्यालयांचे वेळापत्रक नव्याने आखण्यात आले असून, त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. जनतेचे हिताकरिता शिबीर कार्यालयात वाढ करण्यात आल्याचे कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.
शिबिर कार्यालयांचे नियोजन पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे
- शिबिर कार्यालय क्र. १ : अंबरनाथ – दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवार व शुक्रवार.
- शिबिर कार्यालय क्र. २ : बदलापूर – दर महिन्याच्या प्रत्येक सोमवार व गुरुवार.
- शिबिर कार्यालय क्र. ३ : मुरबाड – दर महिन्याच्या प्रत्येक बुधवार.