कल्याण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर आणि मुंबईत मराठी भाषेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ भैय्याजी जोशी यांच्या विरोधात शुक्रवारी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण विभागातील कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन केले. या तीन जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय साळवी, शहरप्रमुख सचिन बासरे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन शिवसैनिक अधिक संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सोलापूरकर, कोरटकर, जोशी यांच्या निषेधाच्या घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात आल्या. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना जोपर्यंत कायद्याने कठोर शिक्षा होत नाहीत, तोपर्यंत हे प्रकार सुरूच राहतील. त्यामुळे ही विषवल्ली वेळीच ठेचून काढणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाप्रमुख विजय साळवी यांनी व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणून महाराष्ट्र शासनाकडून, मराठी जनतेकडून अनेक वर्ष प्रयत्न सुरू होते. अखेर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. हा दर्जा मिळाल्यानंंतर त्यांचे कौतुक करण्याऐवजी भाजप सरकार पक्षातील एक घटक असलेल्या संघाचे भैय्याजी जोशी यांनी केलेले वक्तव्य म्हणजे मराठी अस्मिता आणि मराठी भाषेचा अपमान आहे. या संतापजनक वक्तव्याची गंभीर दखल घेऊन राज्य शासनाने भैय्याजी जोशी, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांना अटक करावी, अशी जोरदार मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली. आपल्या व्यवस्थेचे हे मारेकरी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे मत शहरप्रमुख सचिन बासरे यांनी व्यक्त केले.