ठाणे : शिवसेनेतील फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांची साथ देणारे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाणे आणि कल्याण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भोईर यांनी घेतलेली भेट राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जात असून या भेटीच्या निमित्ताने भोईर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणून भोईर ओळखले जात असून त्यांनी मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि भाजपच्या नेत्यांशी भोईर यांनी जुळवून घेतल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेतील फुटीनंतरही अनेक आजी-माजी आमदार, नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची साथ दिली होती. मात्र, माजी आमदार भोईर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणून भोईर ओळखले जातात. यातूनच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते. यंदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
भोईर हे ठाणे महापालिकेचे नगरसेवकही होते. कल्याण ग्रामीण मतदार संघात ठाणे आणि कल्याण महापालिकांचा परिसर येतो. यामुळे दोन्ही महापालिकांच्या क्षेत्रात त्यांनी यापुर्वी प्रतिनिधीत्व केले आहे. याच भागात ते शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या तोंडावर राजकीय हालचाली वाढल्या असतानाच, माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असून या भेटीच्या निमित्ताने ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी
माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून या भेटीदरम्यान, भोईर यांनी मागण्यांचे एक पत्र त्यांना दिले. जुना मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर कल्याणफाटा ते कळंबोली पर्यंत मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत असते. उरण जे.एन.पी.टी. बंदरातून दररोज सुमारे वीस ते पंचवीस हजार कंटेनर, अवजड वाहने नाशिक, गुजरात तसेच इतर राज्यांमध्ये वाहतूक करीत असल्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. याच परिसरात लोकनेते दि. बा. पाटील नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे या महामार्गावरून भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेला चार पदरी महामार्ग आठ पदरी करावा अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. त्यावर सकारात्मकता दर्शवून तातडीने प्रस्ताव तयार करण्यास मुख्यमंत्र्यांनी सबंधीताना सांगितल्याचे भोईर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली
दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा हा एकमेव महामार्ग आहे. हा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत येतो. हा चार पदरी महामार्ग अपुरा पडत असून तो आठ पदरी केल्यास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी दूर होवून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या महामार्गावरून पुणे, मुंबई तसेच कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावार वाहतूक होत असते. या महामार्गावर अवजड वाहन बंद पडले अथवा अपघात झाला तर या महामार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे कल्याण फाटा ते कळंबोली महामार्ग आठ पदरी करण्याची मागणी माजी आमदार सुभाष भोईर यांनी केली असून त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.
