ठाणे-भिवंडी-कल्याण ते तळोजा परिसर मेट्रो मार्गाने जोडला गेल्यानंतर या मार्गावरून दररोज दोन लाख ६२ हजार प्रवासी प्रवास करतील, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने दिली. या मेट्रो मार्गामुळे रस्ते, रेल्वे मार्गावर येणारा प्रवाशांचा भार कमी होऊन गर्दीचे विभाजन होणार असल्याने प्रवाशांना गर्दीमुक्त सुटसुटीत प्रवास करता येईल. आतापर्यंत नवी मुंबईत जाणाऱ्या भिवंडी, कल्याण, डोंबिवलीतील प्रवाशांना ठाणे येथून रेल्वेने, शिळफाटा रस्ते हा एकमेव मार्ग होता. नवी मुंबई, पनवेल परिसरातून ठाणे, भिवंडी, कल्याण परिसरात येणाऱ्या प्रवाशांना ठाणे येथून रेल्वे प्रवास, शिळफाटा रस्ता हा एकमेव मार्ग उपलब्ध होता. कल्याण-तळोजा मेट्रो मार्गामुळे भिवंडी, कल्याण, डोंबिवली, २७ गाव, बदलापूर, अंबरनाथ परिसरातील प्रवासी या मेट्रो मार्गाने इच्छित स्थळी प्रवास करतील, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने सांगितले.

२०३१-३२ पर्यंत पर्यंत दोन लाख ६२ हजार, त्यानंतरच्या १० वर्षात ही प्रवासी संख्या सुमारे तीन लाखापर्यंत पोहचली असेल. सार्वजनिक वाहतूक सुविधांंपासून वंचित असलेल्या शिळफाटा भागातील नवीन गृहसंकुल भागातील रहिवाशांना मेट्रो सुविधेचा सर्वाधिक लाभ होणार आहे. आतापर्यंत २७ गाव, पलावा परिसरातील नागरिकांना रिक्षा, केडीएमटी, नवी मुंबई परिवहन या सार्वजनिक बस वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. त्यांची अडचण मेट्रो मार्गामुळे दूर होणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा… ठाणे : महिन्याभरासाठी घोडबंदर मार्गावर मध्यरात्री वाहतूक बदल

कल्याण – तळोजा मेट्रो मार्गात कल्याणकडून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती, गणेशनगर, पिसवली, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, कोळे, हेदुटणे, निळजे, वडवली खुर्द, बाळे, वाकळण, तुर्भे, पिसार्वे, अमनदूत ते नवी मुंबई अशी १९ उन्नत स्थानके असणार आहेत. कोळे ते वाकळण, अमनदूत भाग हा आतापर्यंत आडबाजुचा परिसर म्हणून ओळखला जात होता. सार्वजनिक बस सेवा हीच या भागातील रहिवाशांची वाहतुकीची सुविधा होती. या भागातील प्रवाशांना गावापासून दूर अंतरावरील थांब्यावर जाऊन रिक्षा, बस, खासगी वाहनाने डोंबिवली, शिळफाटा, तळोजाकडे जावे लागत होते.

हेही वाचा…. शहापूर : शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण, डोंबिवली परिसरातील प्रवाशांना नवी मुंबईत जाण्यासाठी बसने दीड ते दोन तास आणि ठाणे येथून लोकलने दीड तासाचा प्रवास करावा लागत होता. तळोजा मेट्रो मार्गामुळे हा प्रवास येत्या तीन वर्षात प्रकल्प पूर्ण झाल्यावर ४५ मिनिटावर येणार आहे. मेट्रो मार्गाचा प्रवाशांकडून अधिक प्रमाणात वापर होऊ लागल्यानंतर रिक्षा, बस मधील प्रवासी वाहतुकीवर त्याचा परिणाम होईल. या वाहनांचे रस्त्यावरील प्रमाण हळूहळू कमी होऊन रस्ते वाहतुकीत सुसुत्रता येईल. इंधन वापरात घट, हरितवायू उत्सर्जन कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारेल, असे पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञाने सांगितले.