कल्याण – कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा, गणेशनगर भागातील एका विमान तिकिटे काढून देणाऱ्या मध्यस्थाने कल्याणमधील खडकपाडा भागातील एका पर्यटन कंपनीला चेंबुर येथील ५०० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मुंबई ते दिल्ली विमान तिकीट प्रवासासाठीचे तिकीट काढून देण्याचे आश्वासन दिले. या बदल्यात २९ लाख ७८ हजार रूपये पर्यटक कंपनीकडून वसूल केले. त्यानंतर २५० विद्यार्थ्यांची तिकिटे काढून उर्वरित विद्यार्थ्यांची विमान तिकिटे काढून न देता पर्यटन कंपनीची १५ लाख ३७ हजार रूपयांची फसवणूक केली आहे.

यासंदर्भात खडकपाडा येथील मंगला व्हॅली गृहसंकुलातील पर्यटन कंपनी चालकाकडून खडकपाडा पोलीस ठाण्यात विमान तिकिटे काढून न देणाऱ्या एका तीस वर्षाच्या मध्यस्था विरुध्द तक्रार केली आहे. हा मध्यस्थ बेतुरकरपाडा भागातील गणेशनगर परिसरातील तिवारी इमारतीत राहतो, असे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे. सप्टेंबर २०२४ ते जुलै २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

कल्याणमधील पर्यटन कंपनीच्या एका संचालकाने खडकपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की चेंबुर येथील शहा ॲन्ड ॲन्कर कच्छी इंजिनीअरिंग महाविद्यालयातील ५०० विद्यार्थ्यांचा मुंबई ते दिल्ली विमान प्रवासाची तिकिटे काढून देऊन या प्रवासाचे काम आपण घेतले होते. यासाठी लागणारी ५०० विद्यार्थ्यांची तिकिटे काढून देण्याचे काम आपण बेतुरकरपाडा येथील एका मध्यस्थाला सांगितले होते. मध्यस्थाने १०० विद्यार्थ्यांचे प्रती विद्यार्थी याप्रमाणे पाच हजार ७०० रूपये विमान तिकिटाचे भाडे एकूण रूपये पाच लाख ७० हजार रूपये पर्यटन कंपनी संचालकाकडून घेतले. त्यानंतर १५० विद्यार्थ्यांचे प्रति विद्यार्थीप्रमाणे पाच हजार ८०० रूपये असे एकूण आठ लाख ७० हजार रूपये आणि त्यानंतर २५० मुलांचे प्रति विद्यार्थी सहा हजार १५० रूपयांप्रमाणे १५ लाख ३७ हजार ५०० रूपये असे एकूण २९ लाख ७८ हजार ५०० रूपये खडकपाडा येथील पर्यटन कंपनी संचालकाकडून वसूल केले.

मध्यस्थाने जानेवारी २०२५ मध्ये २५० विद्यार्थ्यांची मुंबई ते दिल्ली विमान प्रवासाची तिकिटे पर्यटन कंंपनी संचालकाला काढून दिली. पर्यटन कंपनी संचालकाचा विश्वास संपादन केला. अशाच पध्दतीने उर्वरित विद्यार्थ्यांची तिकिटे मिळतील असे पर्यटन कंपनी संचालकाला वाटले. दुसऱ्या टप्प्यातील २५० विद्यार्थ्यांची तिकिटे एक आठवडा उलटला तरी मध्यस्थाने काढून दिली नाहीत. खडकपाडा येथील पर्यटन कंपनी चालकाने ज्या २५० विद्यार्थ्यांची विमान तिकिटे काढली नाहीत त्यांच्या तिकिटांचे पैसे परत करण्याची मागणी केली. वारंवार मागणी करूनही मध्यस्थ तिकिटांचे पैसे परत करण्यास तयार नव्हता. आपल्याकडून विमान तिकिटांसाठी पैसे घेऊन त्यामधील २५० मुलांची तिकिटे काढून न देता आपली १५ लाख ३७ हजार रूपयांची मध्यस्थाने फसवणूक केली म्हणून खडकपाडा येथील पर्यटन कंपनी संचालकाने बेतुरकरपाडा येथील मध्यस्था विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक टी. जी. जोशी याप्रकरणाचा तपास करत आहेत.