कल्याण – कल्याण शहर परिसरातील अनेक परप्रांतीय कुटुंबे छट पूजेनिमित्त कल्याण मुरबाड मार्गावरील रायते येथील उल्हास नदीकाठी पूजेसाठी सोमवारी संध्याकाळी आली होती. या कुटुंबातील दोन लहान मुले पोहण्यासाठी नदीत उतरली. पण खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडाली.
उल्हास नदीत दोन मुले बुडाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी संध्याकाळी बोटी नदी पात्रात उतरवून परिसरात बुडालेल्या मुलांचा शोध घेतला. ती आढळून आली नाहीत. अंधार पडल्याने अग्निशमन जवानांंना नदीत मुलांचा शोध घेणे अवघड होऊ लागल्याने त्यांनी रात्री उशिरा शोधकार्य थांंबवले. मंगळवारी सकाळी पुन्हा या मुलांचा नदी पात्रात जवानांंकडून शोध घेण्यात येत होता.
छट पूजेचा कार्यक्रम श्रध्दाळूंकडून वाहत्या पाण्याजवळ केला जातो. त्यामुळे कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील अनेक परप्रांतीय भाविक आपल्या कुटुंबीयांसह घर परिसरातील खाडी, नदी परिसरात छटपूजेसाठी आले होते. कल्याण शहर परिसरातील अनेक कुटुंबे वाहनाने कल्याण मुरबाड रस्त्यावरील रायता पूल भागात छट पूजेसाठी आले होते. पाच ते सहा कुटुंब याठिकाणी छट पूजा करत होती. छट पूजेचा विधी सुरू असताना या कुटुंबीयांमधील दोन लहान मुले कुटुंबीयांची नजर चुकवून नदी पात्रात पोहण्यासाठी उतरली.
पण उल्हास नदीचे रायता येथील पात्र खोल आहे. त्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने आणि नदीतील वाहत्या पाण्याला मुसळधार पावसामुळे वेग आहे. त्यामुळे नदी पात्रात संध्याकाळच्या वेळेत पोहत असलेली मुले अचानक दिसेनासी झाली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. मुले नदी पात्रात कोठेही आढळली नाहीत.
नदीत उतरलेली दोन मुले बुडाली असल्याचे नदी किनाऱ्यावरील काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ओरडा करून दोन मुले नदी पात्रात बुडाली असल्याचे जाहीर केले. त्यावेळी प्रत्येक कुटुंब आपली मुले कोठे आहेत याचा शोध घेऊ लागली. एका कुटुंबाला आपली मुले आपल्याजवळ आणि परिसरात नसल्याचे लक्षात आले. ती कोठेच आढळून आली नाहीत. त्यामुळे आपली मुले बुडाली असल्याचे एका कुटुंंबाच्या निदर्शनास आले.
मुले बुडाल्यानंतर आम्हाला याठिकाणी छट पूजेचा कार्यक्रम होत नाही, असे उपस्थित नागरिक, पोलिसांनी सांगितले. आम्हाला हे अगोदरच माहिती असते. नदी पात्र खोल आहे हे आम्हाला आगाऊ समजले असते तर आम्ही याठिकाणी आलोच नसतो. कुटुंबीयांनी मुले बुडाल्याचा ठपका याठिकाणी गस्तीवर असलेल्या यंत्रणेवर ठेवला आहे. टिटवाळा पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत. बुडालेल्या मुलांची नावे समजू शकली नाहीत.
