कल्याण : कल्याण पश्चिमेतील नवीन कल्याणमधील खडकपाडा भागात रात्रीच्या सुमारास कल्याण पश्चिम भागाला पाणी पुरवठा करणारी ७०० मिलीमिटर व्यासाची एक जलवाहिनी फुटली. गृह विभागाकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उभारणी करण्यासाठी जेसीबीच्या माध्यमातून सुरू असलेल्या खोदकामाच्यावेळी ही जलवाहिनी फुटली. शेकडो लीटर पाणी फुकट गेले आहे. अचानक जलवाहिनी फुटल्याने कल्याण पश्चिमेतील ब आणि क प्रभागातील काही भागांना पाणी टंचाईची झळ बसणार आहे.
गेल्या दहा दिवसापूर्वी कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळील महम्मद अली चौकात पुष्पराज हाॅटेल समोरील ३५ वर्ष जुनी असलेली भूमिगत जलवाहिनी फुटली. पश्चिमेच्या रहिवाशांना दोन ते तीन दिवस पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले. या जलवाहिनीचा जुनाट भाग बाजारात उपलब्ध नसल्याने ही जलवाहिनी सांधण्यासाठी पालिक अधिकाऱ्यांना कसरत करावी लागली. त्यानंतर पश्चिमेचा पाणी पुरवठा सुरळीत झाला.
कल्याण, डोंंबिवली शहरांच्या विविध भागात, मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर शासन निर्देशाप्रमाणे गृह विभागाकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कामे सुरू आहेत. महापालिका आणि गृह विभाग यांच्या समन्वयातून ही कामे सुरू आहेत. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागात शनिवारी रात्री सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे खांंब उभारणीसाठी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू होते. हे खोदकाम करताना जेसीबी चालकाच्या भूमिगत जलवाहिनी निदर्शनास आली नाही.
जलवाहिनी फुटताच जलवाहिनीतील अति दाबाने पाण्याचे उंच वेगाने फवारे उडू लागले. पालिका, गृह विभागातील अधिकाऱ्यांनी समन्वयाने ही कामे करावीत, असे निर्देश आहेत. तरीही गृह विभागाकडून, त्यांच्या ठेकेदाराकडून पालिका अधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच खोदकामाची केली जात आहेत. त्यामधून हा प्रकार घडला आहे.
बारावे जलशुध्दीकरण केंद्रातून आलेल्या या जलवाहिनीतून खडकपाडा परिसर, लालचौकी, आधारवाडी परिसराला पाणी पुरवठा केला जातो. मध्यरात्री जलवाहिनी फुटल्याने कल्याण पश्चिमेच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशावरून कल्याण डोंबिवली पालिकेच्या जल अभियंता अनिता परदेशी, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारावे येथील या जलवाहिनीवरून होणारा पाणी पुरवठा काही वेळ बंद करून पहाटेच जलवाहिनी दुरूस्तीचे काम तंंत्रज्ञांनी हाती घेतले आहे.
शहरांमध्ये सीसीटीव्ही उभारणीसाठी गृह विभागाला पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. या कामासाठी खोदकाम करताना जलवाहिनी फुटण्याचा प्रकार घडला आहे, अशी माहिती जल अभियंता अनिता परदेशी यांनी दिली. मुसळधार पावसात तंत्रज्ञांना दुरुस्तीचे काम करावे लागले.
गृह विभागाकडून खडकपाडा भागात सीसीटीव्ही उभारणीसाठी खोदकाम करताना पालिकेची भूमिगत जलवाहिनी फुटली. या वाहिनीवरील पाणी पुरवठा काही वेळ बंद करून तातडीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. हे काम येत्या दोन तासात पूर्ण करून पश्चिमेचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल.- अनिता परदेशी, जल अभियंता, कडोंमपा.