बदलापूरः ठाणे जिल्हा ग्रामीणच्या निवडणूक प्रमुखपदी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भाजपने निवड केली. त्यामुळे येत्या काळात कुळगाव बदलापूर या आमदार किसन कथोरे यांचा प्रभाव असलेल्या पालिकेत कपिल पाटील सक्रीयपणे दिसतील. मात्र या निमित्ताने दोन बड्या नेत्यांमध्ये गेल्या काही वर्षातला उघड संघर्ष संपण्याची आशा आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजप इच्छुक उमेदवारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या दोन नेत्यांमधील संघर्षामुळे भाजपलाच फटका बसत होता. तर आता भाजपची ताकद वाढणार असल्याची आशा पदाधिकाऱ्यांना आहे.
ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष आहे. भाजपचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यात हा संघर्ष पाहायला मिळाला. लोकसभा निवडणुकीत जातीय राजकारणामुळे आपल्याला फटका बसल्याचे आऱोप कपिल पाटील यांनी पराभवानंतर केले होते.
तर त्यासाठी आमदार किसन कथोरे यांनाच त्यांनी जाहीरपणे दोषी ठरवले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत कपिल पाटील यांच्या समर्थकांनी कथोरे यांना अप्रत्यक्ष विरोध केल्याची चर्चा होती. कथोरे यांनीही विधानसभेतील विजयानंतर माजी लोकांना आजी होऊ देणार नाही, असा थेट इशारा दिला होता. त्यामुळे कथोरे आणि पाटील यांच्यातील संघर्ष वाढत गेला होता.
या दोन नेत्यांच्या संघर्षात कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या पातळीवर माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांचीही कोंडी झाली होती. नक्की कुणाच्या मागे जायचे आणि कुणाला समर्थन द्यायचे या संभ्रमात पदाधिकारी होती. त्याचवेळी भाजपने राज्यात जाहीर झालेल्या पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रभारी आणि निवडणूक प्रमुखांची निवड केली आहे. त्यात ठाणे जिल्ह्याची प्रभारी म्हणून वनमंत्री गणेश नाईक यांची वर्णी लागली आहे.
तर ठाणे जिल्हा ग्रामीणपदी कपिल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे कपिल पाटील आता कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत भाजपच्या वतीने सहभागी होतील. या निमित्ताने आमदार किसन कथोरे आणि निवडणूक प्रमुख कपिल पाटील यांच्यातील दरी संपेल अशी पदाधिकारी आणि इच्छुकांना आशा आहे. दोन नेत्यांमधील मतभेद निवडणुकीच्या निमित्ताने संपल्यास त्याचा भाजपला मोठा फायदा होईल. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. कुणाच्या गोटात सामील व्हायचे या प्रश्नावरही भाजप पदाधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कपिल पाटील लवकरच निवडणूक प्रमुख म्हणून शहरात बैठक घेणार आहेत. कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत शहरातील उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. पदाधिकारी शहरात काम करत असून नक्कीच आम्ही विजयाच्या दृष्टीने काम करत आहोत. – किरण भोईर, भाजप शहप्रमुख, बदलापूर पश्चिम.
