डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव प्रभाग हा उंच, सखल भूभाग आहे. या भागात पावसाळ्यात कोठेही पाणी तुंबू नये म्हणून गटार, नाल्यांची पाहणी करत असताना ग प्रभागाच्या प्रभारी साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांना आयरे गाव हद्दीत गटार, नाले बुजवून बेकायदा चाळी उभारल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने तोडकाम पथकाला पाचारण करून गटार, नाल्यांचे प्रवाह बुजवून उभारलेल्या बेकायदा चाळी जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केल्या.
मुसळधार पाऊस सुरू झाला की कोपर पूर्व रेल्वे स्थानक, भोपर, आयरे प्रभागात हरितपट्ट्यांवर मागील पंधरा वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या बेकायदा चाळी, इमारतींमुळे आयरे गाव परिसर नेहमीच पुराच्या पाण्याखाली जातो. आपल्या प्रभाग हद्दीत कोठेही पाणी तुंबणार नाही. सखल भाग असेल तर तेथे पाणी साचणार नाही, नाले, गटारांमधील पाणी सळसळ वाहून जाईल यादृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रभागातील साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
या आदेशाप्रमाणे ग प्रभागाच्या प्रभारी साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर दोन दिवसापूर्वी आयरेगाव, म्हात्रेनगर परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये नाले, गटार सफाई, सखल भाग, ज्या भागात पुराचे पाणी घुसते त्या भागाची पाहणी करत होत्या.
ही पाहणी करत असताना आयरे गाव हद्दीत नाले, गटारे बुजवून भूमाफियांनी बेकायदा चाळींची उभारणी केली असल्याचे आणि बेकायदा चाळी उभारणीसाठी १५ जोत्यांची नव्याने बांधकामे करून ठेवली असल्याचे निदर्शनास आले. या बांधकामांमुळे परिसर जलमय होण्याची शक्यता होती. साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी या बेकायदा चाळी, जोत्यांची उभारणी कोणी केली आहे याची माहिती परिसरात घेण्याचा प्रयत्न केला. कोणीही माहिती देण्यासाठी पुढे आले नाही.
या बेकायदा चाळींमुळे पावसाळ्यात नाले, गटार तुंबून परिसर जलमय होण्याची शक्यता होती. त्यामुळे नाले, गटारे बुजवून उभारण्यात आलेल्या या पाच बेकायदा चाळी, १५ जोते तात्काळ तोडण्याचा निर्णय साहाय्यक आयुक्तांनी घेतला. जेसीबीसह तोडकाम पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. नाले, गटारे बुजवून उभारण्यात आलेल्या पाच बेकायदा चाळी आणि परिसरातील १५ जोत्यांची बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने तोडून टाकण्यात आली. या बेकायदा बांधकामांमुळे परिसरातील रहिवासी अस्वस्थ होते. भूमाफियांच्या दहशतीमुळे या बेकायदा बांधकामांना स्थानिक रहिवासी विरोध करू शकत नव्हते.
साहाय्यक आयुक्तांनी स्वताहून ही बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
ग प्रभाग हद्दीतील आयरे परिसर हा उंच, सखल भूभागाचा परिसर आहे. या भागात पावसाळ्यात कोठेही पाणी तुंबू नये याची पाहणी केली जात आहे. या पाहणीच्यावेळी नाले, गटारे, सखल भागात पाण्याला अडसर होईल अशी बेकायदा बांधकामे दिसत आहेत. ती तोडून टाकली जात आहेत. ही बांधकामे माफियांनी पुन्हा उभारली तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. – हेमा मुंबरकर, प्रभारी साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग, डोंबिवली.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.