कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या (केडीएमटी) पालिका हद्दीतील बहुतांशी बस थांब्यांजवळ दुचाकी, खासगी चारचाकी वाहने, रिक्षा उभ्या करण्यात येत असल्याने केडीएमटीच्या चालकांची डोकेदुखी वाढली आहे. बस थांब्यावर नेण्यापूर्वी चालकाला बस मधून उतरुन थांब्या जवळ उभी केलेली दुचाकी बाजुला करुन मग बस थांब्यावर आणावी लागते. प्रवाशांनाही या घुसखोर वाहनांचा त्रास होत आहे.

कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या बसची वारंवारिता कमी आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेक दुचाकी, मोटार चालक बस थांब्या जवळील मोकळ्या जागेत आपली वाहने उभी करुन कामाच्या ठिकाणी निघून जातात. काही जण बाजारात खरेदी करण्यासाठी जातात. एक ते दोन वाहने बस थांब्या जवळ उभी राहिली की इतर वाहन चालक त्याच्या आडोशाने वाहने उभी करुन निघून जातात. या कालावधीत केडीएमटी उपक्रमाची बस थांब्यावर आली तर बस कोठे उभी करायची, असा प्रश्न बस चालकाला पडतो.
प्रवासी बसची वाट पाहण्यासाठी अनेक वेळा बस थांब्यावर उभे राहतात. त्यांना बस थांब्याच्या चारही बाजुने उभ्या केलेल्या खासगी वाहनांमुळे उभे कोठे राहायचे असा प्रश्न पडतो. केडीएमटी बस चालकाला कल्याण डोंबिवलीत या घुसखोर वाहन चालकांचा सर्वाधिक त्रास होत आहे. अनेक चालकांनी यासंदर्भात केडीएमटीच्या वरिष्ठांकडे तक्रारी करुन बस थांब्या जवळ वाहने उभे करणाऱ्या वाहन चालकांविरुध्द कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा: डोंबिवलीतील ठाकुर्ली रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्याची उभारणी; नागरिकांचा त्रास वाचणार

या तक्रारीची दखल घेऊन केडीएमटीच्या वरिष्ठांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक विभागांना पत्र देऊन बस थांब्याच्या दोन्ही बाजुने ४० मीटर परिसरात एकही वाहन दिसणार नाही या दिशेने कारवाई करण्याची मागणी या दोन्ही विभागांकडे केली आहे. केडीएमटीचे वाहतूक निरीक्षक तिकीट तपासणीसाठी शहराच्या विविध भागात फिरतात. त्यांना बस थांब्या जवळ खासगी वाहने नियमबाह्य उभे केल्याचे आढळून आले तर ते तात्काळ स्थानिक वाहतूक अधिकाऱ्यांना कळवून संबंधित वाहन चालकावर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतात, असे परिवहन उपव्यवस्थापक संदीप भोसले यांनी सांगितले.कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक भागात, शहराच्या विविध भागात पालिकेची वाहनतळे नाहीत. बहुतांशी खासगी वाहने वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या रस्त्यांवर सम विषम तारखेला उभी केली जातात. काही खासगी वाहन चालक या नियमाकडे दुर्लक्ष करुन मोकळी जागा मिळेल त्या रस्ते, गल्ली बोळात वाहन उभे करुन कामाच्या ठिकाणी, बाजारात खरेदीसाठी जातात. या नियमबाह्य घुसखोरीचा सर्वाधिक फटका केडीएमटी बस चालकांना बसत आहे.

हेही वाचा: मुंबई महानगरात प्रथमच ‘स्काय डायव्हिंग’चा आविष्कार; नागरिकांना घेता येणार हवेत तरंगत मेजवानीचा आस्वाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“केडीएमटी बस थांब्याच्या दोन्ही बाजुला ४० मीटर परिसरात एकही खासगी वाहन उभे असेल तर संबंधित खासगी वाहन चालकावर कारवाई करण्यासाठी आरटीओ, वाहतूक विभागांना पत्र दिली आहेत. केडीएमटी अधिकाऱ्यांकडूनही अशा खासगी चालकांवर कारवाई केली जात आहे. ही कारवाई मोहीम अधिक गतिमान करावी यासाठी दोन्ही यंत्रणांकडे मागणी केली जाणार आहे. ” -संदीप भोसले, परिवहन उपव्यवस्थापक, केडीएमटी