कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या डोंबिवली पूर्व बाजीप्रभू चौकातून डोंंबिवली एमआयडीसी, लोढा संकुल भागात धावणाऱ्या वातानुकूलित बस मागील पाच दिवसांपासून बंद आहेत. अचानक या दोन्ही मार्गिकांवरील बस बंद झाल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.
या दोन्ही मार्गावर कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाने प्रवाशांच्या सोयीसाठी साध्या बस सोडल्या आहेत. डोंबिवलीतून एमआयडीसी निवासी, लोढा संकुल भागात धावणाऱ्या केडीएमटीच्या वातानुकूलित बसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. परिवहन उपक्रमाला महसूल मिळून देणारे हे दोन्ही मार्ग ओळखले जातात. मुंबईतून लोकलने धक्केबुक्के खात घरी परतणाऱ्या डोंबिवलीतील प्रवाशांना डोंबिवली रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर एकदा केडीएमटीच्या वातानुकूलित लोकलमध्ये बसले की हायसे वाटते.
या बसमध्ये कितीही प्रवाशांची गर्दी असली तरी बस बंदिस्त आणि वातानुकूलित असल्याने प्रवासी समाधानाने प्रवास करत होते. बाजीप्रभू चौकातून एमआयडीसीत थेट प्रवासी भाडे घेऊन धावणाऱ्या, शेअर पद्धतीमधील रिक्षा आहेत. तरीही प्रवाशांची कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या वातानुकूलित बसना सर्वाधिक पसंती असते. गेल्या पाच दिवसांपासून या बस अचानक बंद होऊन त्या ठिकाणी सामान्य बस केडीएमटीकडून सोडण्यात येत असल्याने प्रवासी अस्वस्थ आहेत. वातानुकूलित बस लवकर सुरू करा, अशी प्रवाशांची मागणी आहे. सामान्य बसमध्ये गर्दी असली की प्रवाशांना असह्य होते. उकाड्यामुळे प्रवासी त्रस्त होते. महिला प्रवाशांची सर्वाधिक कुचंबणा होते.
एमआयडीसी निवासी, लोढा संकुल भागात धावणाऱ्या केडीएमटीच्या वातानुकूलित बसमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. या बसच्या उत्पादक कंपनीला दुरूस्तीसाठी कळविण्यात आले आहे. या बसमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून लवकरच या बस प्रवासी सेवेत दाखल होतील. – किशोर घाडी, साहाय्यक परिवहन आगार व्यवस्थापक, केडीएमटी.