ठाणे : काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिंदे गटाने दिलेल्या जाहीरातीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली होती. तसेच बाळासाहेबांचे छायाचित्र लहान आकारात लावण्यात आल्याचेही ते म्हणाले होते. आता शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनीही शिंदे गटा संदर्भातील एक छायाचित्र प्रसारित केले आहे. या छायाचित्रात बाळासाहेबांचे अर्धे छायाचित्रच गायब झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच केदार दिघे यांनी शिंदे गटावर टीकेची झोड उठविली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर त्यांनी भाजप सोबत एकत्र येऊन सत्तास्थापन केली. या घटनेनंतर ते मुख्यमंत्री देखील झाले. परंतु ठाकरे आणि शिंदे यांच्या नेत्यांमध्ये आता विस्तवही जात नाही. ठाणे शहरातील बहुतांश माजी नगरसेवक, पदाधिकारी हे शिंदे यांच्यासोबत आहे. परंतु माजी खासदार राजन विचारे, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यासह काही पदाधिकारी आजही ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे ठाण्यात दोन्ही गटामध्ये उत्तर प्रत्योत्तर देणे सुरुच असते. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिंदे गटाने दिलेल्या जाहीरातीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली होती. तसेच बाळासाहेबांचे छायाचित्र लहान आकारात लावण्यात आल्याचेही ते म्हणाले होते.

केदार दिघेंचा गंभीर आरोप

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांना मानणारा मोठा वर्ग आजही आहे. त्यांचे पुतणे केदार दिघे हे ठाकरे यांच्या शिवसेनेत असून ते ठाणे जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी एक बॅनरचे छायाचित्र प्रसारित केले आहे. हा बॅनर पूर्व द्रुतगती महामार्गावरील एका भागात लावण्यात आला आहे. बॅनवरवर शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्यात आल्याचा उल्लेख आहे. तसेच ठाण्यातील शिंदे गटाच्या नेत्यांचे, लोकप्रतिनिधींचेही छायाचित्र आहे.बॅनवर बाळासाहेबांचा लहान आकारातील एक छायाचित्र असून ते अर्धवट असल्याचे दिसते आहे. हे छायाचित्र केदार दिघे यांनी प्रसारित करुन शिंदे गटावर टीकेची झोड उठविली आहे.

काय म्हणाले केदार दिघे

‘बाळासाहेबांचा अपमान वारंवार शिंदे गट करत आहे. बामदास कदम यांच्या बेताल वक्तव्यानंतर आता ठाण्यात बाळासाहेबांचा फोटो अर्थवट स्थितीत बॅनवरवर लावून या मिंध्ये गटाने स्वत:ची लायकी दाखवून दिली आहे’, असा उल्लेख त्यांनी त्यांच्या एक्स या समाजमाध्यम खात्यावर केला आहे.