ठाणे : खरीप हंगामाची तयारी सुरू होताच ठाणे जिल्ह्यात रासायनिक खते आणि बी-बियाण्यांचा पुरवठा वेगाने सुरू झाला आहे. यासोबतच या निविष्ठांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागाने विशेष पावले उचलली असून, जिल्हास्तरावर एक आणि तालुकास्तरावर पाच असे एकूण सहा भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. निविष्ठांची काटेकोर तपासणी, शेतकऱ्यांच्या तक्रारींचे त्वरित निवारण आणि बेकायदेशीर विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचे काम हे पथक करणार असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली.

खरीप हंगाम हा भारतातील मुख्य शेती हंगामांपैकी एक असून, तो मुख्यत्वे पावसाळ्याच्या काळात म्हणजेच जून ते ऑक्टोबर या कालावधीत असतो. या हंगामात शेतीसाठी आवश्यक असलेल्या निविष्ठांची, यंत्रसामुग्रीची आणि मजुरांची योग्य तयारी करणे अत्यंत गरजेचे असते. त्यानुसार, या खरीप हंगामाची तयारी मे च्या शेवटच्या आठवड्यापासून करण्यास सुरुवात होते. या हंगामासाठी शासनस्तरावर शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत केली जाते. रासायनिक खते, बी-बियाणांचे वाट तसेच ट्रॅक्टर, नांगर, पेरणी यंत्र, फवारणी यंत्र आदी कृषी यंत्रांवर शासन ५० ते ८० टक्के पर्यंत अनुदान अशा विविध स्वरुपाची मदत केली जाते.

यंदाही खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात झाली असून ठाणे जिल्ह्यात रासायनिक खते आणि बी-बियाण्यांचा पुरवठा वेगाने सुरू झाला आहे. यासोबतच या निविष्ठांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथकांची स्थापना केली आहे.

शेतकऱ्यांनी खरेदी दरम्यान विक्रेत्याकडून खरेदी पावती घेतली आहे का, पावतीवर शेतकऱ्यांची सही घेतली जाते का, परवाना नसलेल्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करणे, विक्रेत्यांचे परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्रांची वैधता तपासणे तसेच गुणवत्तेच्या संदर्भातील इतर जबाबदाऱ्यांची पूर्तता करणे अशी कामे या पथकामार्फत केली जाणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना आवाहन

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी खते आणि बियाणे खरेदी करताना खरेदीची पावती घेण्याची खात्री करावी. तसेच कोणतीही शंका अथवा तक्रार असल्यास भरारी पथकाच्या सदस्यांशी थेट संपर्क साधावा. कृषी विभागामार्फत गुणवत्तेची हमी दिली जात असून शेतकऱ्यांचे हक्क अबाधित राहावेत, यासाठी ही पथके सक्रियपणे कार्यरत राहतील अशी माहिती कृषी विकास अधिकारी मुनिर बाचोटीकर यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरारी पथकांची रचना

जिल्हास्तरीय भरारी पथकात पथक प्रमुख कृषी विकास अधिकारी असून संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी, वैध मापन शास्त्र निरीक्षक, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे सदस्य असणार आहेत. तर, तालुकास्तरीय भरारी पथकात पथक प्रमुख तालुका कृषी अधिकारी असून तालुका कृषी कार्यालयाचे कृषी अधिकारी, वैध मापन शास्त्र निरीक्षक, मंडल कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी हे सदस्य असणार आहेत