ठाणे – ठाण्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेती, पर्यटन, मत्स आणि निसर्ग अशा अनेक क्षेत्रात कोकण जागतिक कीर्तीचे व्हावे यासाठी दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो. यंदा २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या आठ दिवसाच्या कालावधीत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत ठाण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरनगर येथील ठामपा शाळा क्र. १२० चे पटांगण येथे हा महोत्सव भरविण्यात येणार आहे. यंदा या महोत्सवाचे १८ वे वर्ष आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ, ठाणे आणि शिवसेना गटनेते आणि माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला जातो. कोकण महोत्सवात यावर्षी कोकणातील नाईक मोचेमाडकर पारंपारिक दशावतारी नाटक, वेंगुर्ला, मामा मोचेमाडकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड, वेंगुर्ला, चेंदवणकर दशावतारी नाट्य मंडळ (ट्रिकसिन नाटक) कुडाळ, दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग, जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, सावंतवाडी, श्री बोर्डेकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, दोडामार्ग या प्रसिध्द दशावतार नाट्य मंडळींची ५ पारंपारिक दशावतार आणि ट्रिकसिनयुक्त नाटके, भजनाची डबलबारी, महिलांसाठी खास खेळ पैठणीचा, स्वरार्चना निर्मित सुरेश पाटील, रविंद्र घरत प्रस्तुत महाराष्ट्रातील लोककलांवर आधारित गंध मातीचा, रंग कलेचा बहारदार कार्यक्रम आणि नृत्ये, कोकणरत्न पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मुलांसाठी फनफेअर असणार आहे. कोकण विकासाला गती देण्यासाठी हा महोत्सव मोलाचा ठरणार आहे. कोकण महोत्सव स्वागतासाठी दरवर्षी कोकणवासीयांचा प्रचंड उत्साह असतो. नागरिकांची गर्दी असते. या महोत्सवात ठाण्यापासून वेंगुर्लेपर्यंत सुमारे दीड ते दोन लाख नागरिक भेट देतात.
हे असणार कोकण महोत्सवाचे मुख्य आकर्षण
यंदा कोकण महोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बांदिवडे गावातील श्रीभराडी देवी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असून हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे. तसेच विविध प्रकारचे खाद्यस्टॉल असणार आहेत. यामध्ये कोकणचा अस्सल चवदार झणझणीत म्हावरा, मालवणी मसाला, स्वादिष्ट खडखडे लाडू, मालवणी खाजा, कुळदाची पिठी, सुकी मच्छी, मासे, कोकम, काजू, आंबा फणसवडी, पोहे जगप्रसिद्ध “मुगड्याची झाडू” सूप, रवळी, सावंतवाडी खेळणी, गंजिफा, साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी विविध विषयांवरील पुस्तकांचा स्टॉल देखील असणार आहे.
