डोंंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कोपर गाव मध्ये पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयाने यापूर्वी तोडकामाची कारवाई केलेल्या बेकायदा इमारतीचे बेकायदा बांधकाम भूमाफियांनी पुन्हा सुरू केले आहे. हे बांधकाम सुरू असताना या इमारतीत रहिवास निर्माण करून रहिवाशांच्या जीवाला भूमाफिया धोका निर्माण केला आहे. तळ मजल्याच्या गाळ्यांना रात्रीतून लोखंडी शटर लावून गाळे विक्रीसाठी आणि या गाळ्यांमध्ये दुकाने सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

डोंबिवली पश्चिमेतील कोपर गाव येथील कोपर गावमधील रस्ता संपतो त्या भागात मुख्य वर्दळीच्या पालिकेच्या विकास आराखड्यातील रस्त्यावर सामासिक अंतर न सोडता या बेकायदा इमारतीचे काम दिवस रात्र सुरू आहे. या बेकायदा इमारत बांधकामामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत. डोंबिवलीतील भूमाफियांचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा एक शेंडीधारी या बांधकामाचा मुख्य कर्ता आहे. या बेकायदा इमारतीत पालिकेत यापूर्वी प्रतिनियुक्तीवर असलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याची भागीदारी असल्याची जोरदार चर्चा डोंबिवली शहरात आहे. या बेकायदा इमारतीचे दोन मजले बांधून पूर्ण झाल्यावर पालिकेने कारवाई करू नये म्हणून तात्काळ रहिवास निर्माण करण्यात आला आहे.

या इमारतीत लोक राहतात हे दाखविण्यासाठी समोरील दर्शनी भागात कपडे वाळत घालणे, दर्शनी भागात वातानुकूलित यंत्र लावून ठेवणे, आकाश कंदिल टांगून ठेवणे असे प्रकार भूमाफियांकडून केले जात आहेत. या बेकायदा इमारतीचे बांधकाम सुरू असताना या बेकायदा इमारतीला रहिवासासाठी महावितरणने वीज पुरवठा कोठून दिला, असेही प्रश्न आता तक्रारदार नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

महावितरण इमारतीला तात्पुरत्या स्वरुपात बांधकामासाठी शुल्क आकारून वीज पुरवठा देते. पण, ही बेकायदा इमारत असल्याने आणि या इमारतीचे बांधकाम सुरू असताना महावितरणने या बेकायदा इमारतीला रहिवासासाठी वीज पुरवठा दिलाच कसा. या इमारतीमधील वातानुकूलित यंत्र सुरू कशी झाली आहेत. या दोन माळ्याच्या तयार बांधकामावर आता तिसऱ्या माळ्यापासून रात्रंदिवस भूमाफिया बेकायदा बांधकाम करत आहेत.

डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारती तोडण्याचे नियोजन पालिकेकडून सुरू आहे. या ६५ बेकायदा इमारत न तोडल्याने शासन आणि पालिका अधिकाऱ्यांविरुध्द उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल झाली आहे. डोंबिवली पश्चिमेतील ६५ महारेरा बेकायदा इमारतींंमधील एकूण १८ इमारती आहेत. याशिवाय सरकारी जमिनींवरील १४ बेकायदा इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे आदेश आहेत.

या बेकायदा इमारती तोडण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर असताना भूमाफियांनी कोपर गावमध्ये मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांना न जुमानता बेकायदा बांधकाम सुरू केले आहे. याविषयी नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. हे बेकायदा बांधकाम ह प्रभाग अधिकाऱ्यांनी तातडीने भुईसपाट करण्याची नागरिकांची मागणी आहे.

निर्माणाधिन असलेल्या कोपर गावमधील संबंधित इमारतीची तातडीने पाहणी करतो. या इमारतीच्या बांधकामधारकाला बांधकाम परवानगी, जमिनीची कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजावतो. आणि त्यानंतर पुढील कार्यवाही करतो. राजेश सावंत साहाय्यक आयुक्त,ह प्रभाग. डोंबिवली.