ठाणे – ठाणे तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्राचे शिक्षण मिळावे, या उद्देशातून ठाण्यातील अंबर इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’च्या स्पेस ट्यूटर प्रोग्रामअंतर्गत प्रयोगशाळेची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती शाळेचे संचालक लक्ष्मण कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. भावी अंतराळवीर तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ घडविण्याच्या मुख्य उद्देशातून ही प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असून मुंबई महानगर क्षेत्रातील ही पहिली प्रयोगशाळा असेल असा दावाही त्यांनी यावेळी केला.

अंबर इंटरनॅशनल स्कूल, ‘भारतीय अवकाश संशोधन संस्था’ अर्थात इस्रोच्या स्पेस ट्यूटर प्रोग्राम अंतर्गत व्योमिका स्पेस अकॅडमी यांच्यात शनिवारी सामंजस्य करार करण्यात आला आहे. याबाबतची माहिती शाळेचे संचालक लक्ष्मण कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी अंतराळ संशोधन क्षेत्राचे अभ्यासक डॉ. प्रतीक मुणगेकर, व्योमिका स्पेस अकॅडमीचे गोविंद यादव, शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. प्रदीप ढवळ, अंबर इंटरनॅशनल स्कूलचे संचालक लक्ष्मण कदम, शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, कल्पेश जाधव, दिलीप त्रिपाठी यांच्यासह दूरदृश्यप्रणाली द्वारे इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. टी एन सुरेशकुमार उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्राचे शिक्षण मिळावे या उद्देशाने या प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अंतराळ संशोधन क्षेत्रासंदर्भात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रतिभा आणि गुणवत्ता असूनही या क्षेत्रात राज्याचे प्रतिनिधित्व कमी दिसून येते. शालेय वयातच अंतराळ संशोधन क्षेत्राची ओळख करून देणारी विशेष पायाभूत सुविधा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्यास या क्षेत्रात मराठी टक्का वाढेल, असे मत अंतराळ संशोधक क्षेत्रातील अभ्यासक डॉ. प्रतिक मुणगेकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र हे औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राज्य असून देशाच्या अंतराळ क्षेत्रात मोठे योगदान देण्याची क्षमता असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर शास्त्रज्ञ व संशोधकांचे मार्गदर्शन या माध्यमातून ठाण्यातील विद्यार्थ्यांना या प्रयोगशाळेचा फायदा होणार असल्याचा विश्वास प्रा.डॉ.ढवळ यांनी व्यक्त केला. तर अशा प्रयोगशाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि विज्ञानाची आवड निर्माण होईल, असे मत इस्त्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.टी. एन.सुरेशकुमार यांनी व्यक्त केले.