ठाणे : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ई-केवायसी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. सरकारने याबाबत नवीन नियमावली जारी केली असून सर्व लाभार्थींनी एका अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र हा आर्थिक हफ्ता सुरू रहावा यासाठी एकाच वेळी लाखो महिलांनी संकेतस्थळावर गर्दी केल्याने पडताळणीची प्रक्रिया मंदावली आहे. तर अनेक महिलांना सातत्याने प्रक्रिया करून ही पडताळणी होत नसल्याची तक्रार केली आहे.

लाडकी बहिण योजना २०२४ मध्ये सुरु करण्यात आली. या योजनेत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत लाखो महिलांना या योजनेचा फायदा झाला आहे. महिलांना घरगुती खर्चात मदत, स्वावलंबन आणि आर्थिक पाठबळ मिळावे या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये या योजनेचे लाभार्थी महिलांसाठीचे निकष अधिक सक्त करण्यात आले आहे. यामुळे महिलांना याची पूर्तता करणे अवघड झाले आहे. तर सातत्याने बदलणाऱ्या या नियमांमुळे महिलांकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आली आहे.

आता सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार लाभ मिळवण्यासाठी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि इतर माहिती भरून ऑनलाइन पडताळणी करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच पुढील महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थी महिलेसाठी ई-केवायसी नोंदणी अत्यावश्यक आहे.

नोंदणीसाठी संकेतस्थळ खुले होताच महिलांनी मोठ्या प्रमाणावर लॉगिन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाढलेला ताण आणि तांत्रिक मर्यादा यामुळे वेबसाइटची गती मंदावली आहे. काही वेळा संकेतस्थळ उघडत नाही, तर काही वेळा आधार पडताळणी अर्धवट राहते. त्यामुळे हजारो महिलांची नोंदणी अपूर्ण असून त्यात विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर लाभार्थींमध्ये नाराजी वाढली आहे आणि शासनाने तातडीने तांत्रिक अडचणी सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.

ग्रामीण भागातील महिलांसमोर ई-केवायसी नोंदणीचे अधिक मोठे आव्हान आहे. अनेक महिलांना मोबाईल आणि इंटरनेटचा पुरेसा वापर करता येत नाही, त्यामुळे ऑनलाइन नोंदणी करणे त्यांच्यासाठी कठीण ठरत आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अशा महिलांना अंगणवाडी सेविका आणि स्थानिक पातळीवरील अधिकारी मदत करतील. गावागावात महिलांना मार्गदर्शन करून त्यांची नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे, त्यामुळे कोणतीही महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे जिल्हा महिला बालविकास विभाग अधिकारी यांनी सांगितले आहे.

लाडकी बहिण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी महिलांना ladki bahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. या संकेतस्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार आता पर्यंत तब्बल १ कोटी १२ लाख महिलांनी नोंदणी साठी अर्ज केले आहेत.

प्रतिक्रिया

या सबंधित संकेत स्थळावर नोंदणी करण्यासाठी एक दोन दिवस प्रयत्न करत आहे. मात्र आधार क्रमांक टाकल्यानंतर मोबाईल वर ओटीपी येतच नाही आहे. आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक आहेत तरीही समस्या येत आहे. – लाभार्थी महिला, ठाणे</strong>