डोंबिवली : तीन वर्षापूर्वी डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारती प्रकरणातील बनावट कागदपत्रे तयार करणारे, या इमारतींच्या माध्यमातून आर्थिक उलाढाली करणारे भूमाफिया सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले होते. त्याचवेळी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन साहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांनीही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केली होती. आता वनमंत्री गणेश नाईक यांच्या रडारवर असलेल्या राजकीय वजनदार जोडीने या दोन्ही चौकशांवर दबाव टाकल्याने नंतर या चौकशा थातुरमातुर करून गुंडाळण्यात आल्या. आता पुन्हा ६५ इमारतीमधील भूमाफियांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी नोटिसा पाठविल्या आहेत, अशी माहिती उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिली.

ईडी आणि ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या दोन वर्षापूर्वी सुरू झालेल्या डोंबिवली ६५ बेकायदा इमारती प्रकरणातील चौकशा विना राजकीय हस्तक्षेप झाल्या असत्या तर, या दोन्ही यंत्रणांनी या प्रकरणाची कठोरपणे चौकशी करून याप्रकरणातील बनावट कागदपत्रे तयार करणारे भूमाफिया, इमारती उभारणारे भूमाफिया, या इमारतींच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यात आलेले बिगारी कामगार आणि या कामगारांच्या बँक खात्यामधून काढून घेतलेली इमारत गुंतवणूक, सदनिका विक्रीची रक्कम काढून घेणारे भूमाफिया आता तुरुंगात खडी फोडत असते. या इमारतींची बनावट कागदपत्रे तयार करणारा एक भूमाफिया सध्या एका वजनदार राजकीय विकास पुरूषाच्या आशीर्वादाने पोलीस बंदोबस्तात फिरत आहे.

हाच भूमाफिया या ६५ बेकायदा इमारतींचा कर्ताधर्ता विश्वकर्मा आहे. याची पूर्ण जाणीव तपास यंत्रणा, डोंबिवलीकरांना आहे. हा भूमाफिया आणि त्यांच्या चेल्यांनी या ६५ बेकायदा इमारतींमधील आपले सर्व कागदोपत्री व्यवहार आपला वाहन चालक, इमारतीवरील मुकादम, कार्यालयात कपबशा धुणारा कामगार यांच्या नावाने केले आहेत. ही व्यवहार झालेली कष्टकरी ओरिसा, झारखंड, उत्तरप्रदेशातील आहेत.

बँका, वित्तीय संस्थांमधून या ६५ इमारती उभारणीसाठी उभारलेले कर्ज भूमाफियांनी परप्रांतीय मजूर, कष्टकरी, बिगारी कामगार यांची आधारकार्ड, पॅनकार्ड आणि बनावट घराचे पत्ते देऊन घेतली आहेत. तीन वर्षापूर्वी ६५ इमारती चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यावर भूमाफियांनी या बिगारी कामगारांना ५० ते एक लाखा रूपयांपर्यतच्या रकमा देऊन चौकशीची डोकेदुखी नको म्हणून आपल्या मूळ परप्रांतात पाठवून दिले. या परप्रांतीयांचे कागदोपत्री कोठेही नाव नसलेले आश्रीत डोंबिवली शहरात महागड्या गाड्यांमधून फिरत आहेत. या पोलीस बंदोबस्तात फिरणाऱ्या आणि कर्ज घेणाऱ्या काही बिगारी कामगारांना परप्रांतामधून आणून ईडी, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले की या प्रकरणातील म्होरक्यांची नावे पुढे येणार आहेत, असे याप्रकरणातील एक तक्रारदार महेश निंबाळकर यांनी सांगितले.

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे गेल्या वर्षापासून ६५ बेकायदा इमारतींमधील रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या भूमाफियांवर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी लावून धरत आहेत. शासनाने विधीमंडळ अधिवेशनात याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. उच्च न्यायालयाने याप्रकरणात ईडीने काय तपास केला आहे, याची विचारणा केली आहे. त्यामुळे ६५ बेकायदा इमारत प्रकरणी आता तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. ईडीने भूमाफियांना नोटिसा पाठविल्या आहेत, असे म्हात्रे यांनी सांगितले.