Shravan2025, ThaneNews ठाणे : हिंदू पंचांगानुसार संपूर्ण वर्षातील पवित्र महिना म्हणून श्रावण महिन्याकडे पाहिले जाते. या श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली असून शिवभक्तांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. भगवान शिवाची भक्ती, उपवास, रुद्राभिषेक, आणि विविध धार्मिक विधींमुळे संपूर्ण महिना अध्यात्मिक वातावरणाने सजलेला असतो. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार भगवान श्रीशंकराला अर्पण केला जातो. ठाणे शहरासह मुंबई उपनगरातील ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी दिसून येत आहे.

श्रावण महिना पवित्र असल्यामुळे यामहिन्यात अनेकजण व्रतवैकल्यासह नवस करतात. हा नवस उद्यापन किंवा मंदिरात आरास करुन फेडला जातो. सध्या ठाणेसह मुंबई उपनगरातील श्रीशंकराच्या मंदिरात फळा-फुलांची आरास पाहायला मिळते. परंतू, ठाण्यातील एक खास मंदिर आहे की, श्रावण महिन्यात या मंदिरात भगवान शंकराची भव्य आरास फळं, फुलं आणि बर्फाच्या सहाय्याने सजवली जाते. त्यामुळे ठाण्यातील हे मंदिर भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते. दरवर्षी हजारो भाविक या आरासाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी करतात. धार्मिक वातावरण आणि नयनरम्य सजावट यामुळे हे ठिकाण श्रावणातील एक खास अध्यात्मिक केंद्र ठरते.

ठाणे शहराच्या मुख्य बाजारपेठेत श्रीकौपिनेश्वर हे पुरातन मंदिर आहे. या मंदिरात असलेले शिवलिंग हे महाराष्ट्रातले सर्वात मोठे शिवलिंग असल्याचे बोलले जाते. या मंदिराला प्राचीन इतिहास लाभला आहे. पेशवेकालीन असलेले हे मंदिर ठाणेकरांसाठी श्रद्धास्थान आहे. या मंदिरात केवळ ठाण्यातील नागरिकच नाही तर, शहराबाहेरील नागरिक देखील दर्शनासाठी येतात. ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारावर मोठी नंदी मूर्ती दर्शनाला येणाऱ्यांचे स्वागत करते. या मंदिराच्या आवारात ब्रह्मा, राम, हनुमान, शितला देवी, उत्तरेश्वर, दत्तात्रेय, गरुड, काली आणि गायत्री देवी या देवतांची मंदिरे आहेत. त्यामुळे या मंदिरात आल्यावर प्रत्येकाला प्रसन्न वाटते. या मंदिरात प्रत्येक सोमवारी सकाळ आणि संध्याकाळ भाविकांची गर्दी होत असते. तर, श्रावण महिन्यात या मंदिरात एक उत्साहाचे वातावरण असते. हजारोच्या संख्येने भाविक श्रावणातील दर सोमवारी या मंदिरात येत असतात.

या मंदिरात केली जाते फळ, फुलांसह बर्फाची आरास….

श्रावण महिना पवित्र असल्यामुळे या महिन्यात अनेकजण व्रतवैकल्यांसह नवस करतात. हा नवस कोणी घरात उद्यापन घालून फेडतो तर, कोणी मंदिरात शिवलिंगाभोवती फळ, फुल, चक्का आणि बर्फ याची आरास करतो. श्रीकौपिनेश्वर मंदिरातील (Shree Kopineshwar Temple) शिवलिंग सर्वात मोठे शिवलिंग असल्यामुळे अनेकजण यामंदिरात येऊन नवस फेडण्याकडे प्राधान्य देतात. यासाठी मंदिर व्यवस्थापकाकडे भक्त फळ, फुल, बर्फ, चक्का यापैकी कोणती आरास करायची आहे याची पूर्व नोंदणी करतात. या नोंदणीनंतर प्रत्येक आरासासाठी एक दिवस ठरविला जातो, अशी माहिती मंदिरातील गुरुजी विनायक गाडे यांनी दिली. श्रावणातील दर सोमवारी फुलांची आरास केली जाते. तर, इतर दिवशी फळ, चक्का आणि बर्फाची आरास केली जाते, असेही गुरुजींनी सांगितले.