वनविभागाकडून उपाय केले जात नसल्याने नागरिकांत नाराजी

अंबरनाथ : अंबरनाथच्या आयुध निर्माणीत गेल्या आठवडय़ात आढळलेला बिबटय़ा उल्हासनगरातील सोंग्याची वाडी भागात दिसल्याचे समोर आले आहे, तर त्याच वेळी अंबरनाथच्या जांभूळ परिसरानंतर आता बिबटय़ाने थेट बदलापूर शहराच्या मांजर्ली, साई गाव आणि चिखलोली भागातून प्रवास केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यानंतरही त्याच्या स्थलांतरासाठी वन विभागाकडून हालचाली होत नसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून अंबरनाथ, बदलापूर, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात बिबटय़ाची दहशत पसरली आहे. ऑक्टोबर महिन्यात बिबटय़ाने सर्वप्रथम तीन झाडी परिसरात जंगलात फिरणाऱ्या वासराची शिकार केली होती. त्यानंतर जांभूळ, वसत, शेलवली, भिसोळ पाडा या गावांमध्ये आणि जंगल क्षेत्राच्या जवळ असणाऱ्या वाडय़ांमध्ये ग्रामस्थांच्या पशुधनाची शिकार केली आहे.

जंगल क्षेत्र आणि आसपासच्या वाडय़ांवर फिरणारा बिबटय़ा आता जंगलाच्या बाहेर येत शहरांच्या वेशीवर फेरफटका मारू लागला आहे. गेल्या आठवडय़ात अंबरनाथ पश्चिमेतील जंगलापासून जवळ असलेल्या भारत सरकारच्या आयुध निर्माण संस्थेत बिबटय़ाने दर्शन दिले होते.  जांभूळ  येथील जलशुद्धीकरण केंद्र, रायते येथील कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या उल्हास नदीवरील पुलावरही या बिबटय़ाने फेरफटका मारला होता. त्यानंतर बिबटय़ाला उल्हासनगरच्या वेशीवर असलेल्या सोंग्याची वाडी भागात पाहिल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

दोन दिवसांपूर्वी बदलापूर शहराच्या मांजर्ली भागापर्यंत बिबटय़ाने प्रवास केल्याची माहिती खात्रीलायक  सूत्रांनी दिली आहे. यात जांभूळ, चिखलोली, साई गाव असा प्रवास बिबटय़ाने केल्याचे समजते. वन विभागाने या गोष्टीला अद्याप दुजोरा दिलेला नाही; पण बिबटय़ाच्या मुक्तसंचारामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबटय़ाला दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित  करण्याची मागणी जोर धरते आहे. जांभूळ, वसत शेलवली या ग्रामपंचायतींनी यापूर्वी ग्रामसभेत याबाबतचा ठराव करून वन विभागाला सुपूर्द केला आहे. मात्र त्यावर अद्याप ठोस काही झालेले नाही.

गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीचे अहवाल आणि शिफारशी वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आल्या आहेत. मानवी वस्तीशेजारी बिबटय़ाचा वावर आरे जंगल, सांगली, जुन्नर भागांत असतोच. सध्या तरी मानवाला बिबटय़ामुळे त्रास नाही. मात्र, लवकरच कार्यवाही करू.

गजेंद्र हिरे, उपवनसंरक्षक, ठाणे जिल्हा