ठाणे : परराज्यातील कोट्यवधी रुपयांचा भारतीय बनावटीचा विदेशी मद्यसाठा ठाणे उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. या प्रकरणात विभागाने दोघांना अटक केली असून प्रकरणाचा तपास विभागाकडून सुरु आहे. मोहम्मद समशाद सलमानी आणि देवेंद्र खुमाराम मेघवाल अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. मुंब्रा -पनवेल मार्गावरून परराज्यातील मद्यसाठ्याची वाहतुक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ४ नोव्हेंबरला आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपायुक्त प्रदिप पवार, ठाणे विभागाचे अधीक्षक प्रविण तांबे, उप अधीक्षक वैद्य, पोकळे, ए.डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. मुंब्रा -पनवेलमार्गावरील उत्तरशीव येथे एक ट्रक संशयास्पदरित्या आढळून आल्याने पथकाने तो ट्रक अडविला. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये परराज्यातील मद्याने भरलेले खोके दिसून आले.

यामध्ये एक हजार मद्याचे खोके आढळले असून त्याची किंमत १ कोटी ५ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. परराज्यातील भारतीय बनावटीचे विदेशी मद्य दारूबंदी कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक डी.बी. काळेल, निरीक्षक पी.यु.निकाळजे, दुय्यम निरीक्षक ए.एस.वडक्ते, दुय्यम निरीक्षक अ.गो. सराफ, दुय्यम निरीक्षक आर.एन. आडे, साहाय्यक दुय्यम निरीक्षक आर.बी. खेमनर, जवान व्हि.एस. अहिरे, जवान ए.जे. नगरकर इत्यादी हजर होते.