ठाणे : डोंबिवलीहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमधील काही सहप्रवासी मैत्रिणींच्या गप्पांतून उभा राहिलेला एक उपक्रम आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरला आहे. “आपला प्लॅस्टिक कचरा ही आपली जबाबदारी” हे ब्रीद घेऊन स्थापन झालेल्या ऊर्जा फाउंडेशनने सुरुवातीला पर्यावरणासाठी काम केले, पण आता त्यांनी CSR फंडाच्या माध्यमातून दुर्गम भागातील शाळांना स्वतंत्र वाचनालयाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
लोकल ट्रेनची दुपारची एक सफर. डोंबिवलीहून मुंबईकडे जाणाऱ्या गाडीत काही सहप्रवासी मैत्रिणी रोज भेटायच्या. सुरुवातीला हलक्या-फुलक्या गप्पा, पण हळूहळू विषय गंभीर व्हायला लागला. “हा प्लॅस्टिकचा कचरा वाढत चाललाय, आपल्यापैकी कुणी काही करायला हवे” असे एकीने म्हटले. त्यावर दुसरी म्हणाली, “आपण का नाही पुढाकार घेत? आपल्याकडून थोडे जरी झाले तरी फरक पडेल.” त्या दिवशीची ती चर्चा फक्त शब्दात थांबली नाही, तर कृतीत उतरली. काही दिवसांतच त्या महिलांनी मिळून “ऊर्जा फाउंडेशन” नावाची संस्था उभी केली.
“आपला प्लॅस्टिक कचरा ही आपली जबाबदारी” हे ब्रीद घेऊन त्या कामाला लागल्या.
डोंबिवली आणि ठाणे परिसरातून अनेक टन प्लॅस्टिक जमा करून त्याचे रिसायकलिंग केले. समाजात प्लास्टिक विरोधात जनजागृती केली. पुढे त्यांनी ई-वेस्ट आणि जुने कपडे गोळा करून त्याचे योग्य वितरण केले. हळूहळू ही संस्था केवळ कचरा व्यवस्थापनापुरती मर्यादित राहिली नाही. या सहप्रवासी मैत्रिणींना जाणवले “आपण पर्यावरणासाठी काम करतोय, पण शिक्षणासाठी काय?” तिथूनच नवा प्रवास सुरू झाला. भिवंडी तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांना त्यांनी भेट दिली. मुलांकडे शैक्षणिक साहित्याची टंचाई आहे हे पाहून त्या हळहळल्या. मग पुढील काही वर्षांत शेकडो विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, लेखनसामग्री वाटली. परंतु मनात अजून एक इच्छा पेटलेली होती, “मुलांकडे स्वतंत्र वाचनालय असले तर किती बरे होईल.” CSR फंडातून ती इच्छा आता पूर्ण झाली.
ऊर्जा फाउंडेशनने तुसे येथील माध्यमिक विद्यालय (किल्ले माहुली), पिवळी येथील शाळा के जी विद्यालय, देवघर येथील तसेच बी. ए. राऊत विद्यालय , पाछ्यापूर या शाळांमध्ये उपलब्ध CSR फंडातून वाचनालयाची सुविधा उपलब्ध करून दिली. या शाळांमध्ये वाचनालयासाठी स्वतंत्र खाेली तयार करून दिली. लहानशा शाळांच्या खोल्यांत आता आकर्षक टेबल-खुर्च्या, सुबक कपाटे आणि नवनव्या पुस्तकांचा खजिना मुलांच्या स्वागताला सज्ज झाला. या उपक्रमासाठी तुसे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विशे आणि रावतेपाडा प्रगट विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश पवार यांनी विशेष मेहनत घेतली. या वाचनालयाच्या उद्घाटनाला ऊर्जा फाउंडेशनतर्फे मेधा गोखले, गीता शेट्टीगार आणि विनया जोशी या तिघींनी तीन शाळांना भेट दिली. तसेच उद्घाटनावेळी ऊर्जा फाउंडेशनच्या स्नेहल दिक्षित म्हणाल्या, शाळेत स्वतंत्र वाचनालय सुरू झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहून समाधान वाटले. उरलेल्या निधीतून अजून दोन तीन शाळांमध्ये वाचनालयाची सुविधा देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.