बदलापूरः वांगणी बदलापूर दरम्यान रेल्वे रूळांवर एक व्यक्ती आढळल्याने बदलापूर मुंबई लोकलसेवेचे वेळापत्रक कोलमडले. सकाळी आठच्या सुमारा हा प्रकार समोर आला. कर्जतहून मुंबईकडे जाणारी लोकल यामुळे तब्बल ३५ मिनिटे उशिराने धावली. त्यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली होती. त्यानंतर दिवसभराचे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झालेले होती. नेमका हा व्यक्ती रेल्वे रूळावर कसा आला हे कळू शकलेले नाही. त्याला रेल्वे कर्मचाऱ्यांनी उचलून बदलापुरच्या ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयात नेले असता तेथे त्या व्यक्तीला मृत घोषीत करण्यात आले.

बुधवारी बदलापूरकर रेल्वे प्रवाशांचा लेटमार्क लागला. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकापासून दीड किलोमीटर अंतरावर रेल्वे रूळावर एक व्यक्ती असल्याची माहिती मिळाली. बदलापुरहून ८ वाजून २५ मिनिटांनी सुटणारी लोकल यामुळे खोळंबली. त्याबाबतची माहिती बदलापूर रेल्वे स्थानक व्यवस्थापकांना देण्यात आली. त्यानंतर व्यक्तीला उचलण्यासाठी कर्मचारी पाठवण्यात आले. ही व्यक्ती रूळावरून बाजूला काढण्या आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल पुढे रवाना करण्यात आली. संबंधित व्यक्तीला उपचारासाठी बदलापुरच्या ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. हा प्रवासी रेल्वे रूळावर कसा आला, रेल्वेतून पडून प्रवाशाचा मृत्यू झाला की रेल्वेच्या धडकेने याबाबत प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही.

मात्र या सर्व प्रकारामुळे ८ वाजून २५ मिनिटांनी सुटणारी लोकल बदलापूर स्थानकात ९ वाजता आली. ही लोकल वांगणीपर्यंत वेळेवर आली. मात्र त्यापुढे ही लोकल खोळंबली होती. ही लोकल मुंबईला पोहोचेपर्यंत तब्बल एक तास उशिर झाला होता. त्यांनंतर कर्जतहून मुंबईकडे जाणारी ८ वाजून ५९ मिनिटांची लोकलही उशिराने आली. ९ वाजून ३८ मिनिटांनी मुंबईला जाणारी आणि खोपोलीहून येणारी लोकल एक तास उशिराने धावत होती. बदलापुरहून सुटणाऱ्या लोकल एरवी पाच ते सात मिनिट उशिराने असतात. आज त्याही १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.