ठाणे : पारलिंगी (एलजीबीटीक्यू) समुदायाच्या व्यक्तींप्रति कुटुंब, समाज आणि सरकारने संवेदनशील दृष्टिकोन ठेवणे आवश्यक असल्याचे मत ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मधील संवादसत्रात मंगळवारी मांडण्यात आले. ‘पारलिंगी’ म्हणून या समुदायाला कोणतेही विशेषाधिकार नकोत. पण त्यांना किमान माणूस म्हणून समान अधिकार मिळायला हवेत, अशी अपेक्षा या परिसंवादात व्यक्त करण्यात आली.

‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या चौथ्या दिवशी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘पारलिंगींची अभिव्यक्ती’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात अभिनेता नक्षत्र बागवे, साहाय्यक प्राध्यापक असलेल्या प्रिशा, गोदरेज कंपनीत कार्यरत असलेल्या जामिना बाविस्कर आणि एलजीबीटीक्यू समुदायासाठी काम करत असलेल्या अरुणा देसाई सहभागी झाले होते. नक्षत्र आणि प्रिशा यांनी समलिंगी म्हणून आणि जामिना बाविस्करने ट्रान्सपर्सन म्हणून आलेले अनुभव कथन केले. तर अरुणा देसाई यांनी आपल्या मुलाचे समलिंगी असणे कसे स्वीकारले आणि त्यातून पुढे त्यांनी ‘एलजीबीटीक्यू’ समुदायासाठी काम सुरू केले याबद्दल माहिती दिली. ‘लोकसत्ता’च्या वरिष्ठ मुख्य उपसंपादक लता दाभोळकर यांनी सूत्रसंचालन केले.

आपण आपल्या वर्गातील मुला-मुलींपेक्षा, भावंडापेक्षा वेगळे आहोत याची आधी स्वतःला जाणीव होणे, ती स्वीकारणे आणि त्यानंतर घरच्यांना त्याबद्दल माहिती देणे हा प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा असला तरी त्याबद्दलची भीती हा घटक मात्र समान असल्याचे चौघांनीही सांगितले. हा प्रवास कुटुंबीयांसाठीही अवघड असतो आणि त्यांना त्यासाठी वेळ द्यायला हवा, अशी भावना अरुणा देसाई आणि नक्षत्र बागवे यांनी व्यक्त केली. आपण आपल्या मुलाचे समलिंगी असणे स्वीकारले तर समाजही सहज स्वीकारतो, असे निरीक्षण देसाई यांनी नोंदवले. मुलामुलींशी शाळा, कॉलेजपासूनच या विषयावर संवाद साधायला हवा, असे स्वतः साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या प्रिशाने सुचवले.

समलिंगी व्यक्तीही इतर नागरिकांप्रमाणेच कर भरतात, त्यांना मूलभूत अधिकारही इतर व्यक्तींप्रमाणेच मिळायला हवेत, अशी भावना परिसंवादात सहभागींनी व्यक्त केली. विशेषतः ट्रान्सपर्सनना नोकऱ्या मिळणे फार कठीण असते. त्यांच्या वाट्याला सेक्स वर्कर म्हणून काम करणे, सिग्नलवर भीक मागणे किंवा लग्नसोहळ्यांमध्ये नाचगाणी करणे यासारखे पर्यायच उपलब्ध असतात, अशी खंत जामिना बाविस्करने व्यक्त केली.

आपले मूल समलिंगी असणे हा त्याचा गुन्हा नाही हे पालकांनी समजून घेणे आवश्यक असल्याचे अरुणा देसाई यांनी सांगितले. याबद्दल फारशी माहिती नसली तरीही आधी स्वीकारा आणि मग समजून घ्या असा सल्ला त्यांनी पालकांना दिला. समलिंगी व्यक्तींची लैंगिक अभिमुखता बदलण्यासाठी त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या अत्याचारांची उदाहरणे त्यांनी सांगितली.

सरकारकडून अपेक्षा

सरकार दरबारी आमच्याबरोबर भेदभाव होऊ नये असे आवाहन सर्व सहभागींनी केले. विवाहाचा अधिकार नसल्यामुळे जोडीदाराला वैवाहिक जोडीदार म्हणून दर्जा मिळत नाही. त्यामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयांमध्ये संबंधित फॉर्मवर सही करण्याची परवानगी जोडीदाराला नसते. ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या सदस्यांना रक्तदान करण्याचीही परवानगी नाही, याकडे नक्षत्र बागवेने यावेळी लक्ष वेधले.