कल्याण – रेल्वे स्थानकात गळ्यात सोन्याचा ऐवज, हातात सोन्याची अंगठी असलेल्या प्रवाशाला रेल्वे स्थानकात गाठायचे. त्याच्याशी गोड बोलून संवाद वाढवायचा आणि त्या प्रवाशाला भुरळ घालून त्याला बोलण्यात गुंतवून त्याच्या जवळील सोन्याचा ऐवज लुटून नेणाऱ्या नाशिक येथील मदारी टोळीच्या दोन चोरट्यांना मुंबई आणि कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा लाख रूपये किमतीचा सोन्याचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
या चोरट्यांवर कल्याण लोहमार्ग आणि कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ठाण्यातील एका वृध्द नागरिकाला त्यांचे जावई कल्याण रेल्वे स्थानक भागात भेटण्यासाठी येणार होते. त्यामुळे ठाण्यातील वृध्द नागरिकाने गेल्या पंधरा दिवसापूर्वी ठाणे येथून सकाळीच कल्याणला जाणारी लोकल पकडली. ते कल्याण रेल्वे स्थानकात सकाळी आठ वाजता उतरले. ते कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक येथे आपल्या जावयाची वाट पाहत उभे होते. त्यावेळी या नागरिकाजवळ दोन अज्ञात इसम आले. त्यांनी नागरिकाशी बोलाचाली करून त्यांच्या विश्वास संपादन केला. ते बराच उशीर त्यांच्याशी गप्पा मारू लागले. बोलणे सुरू असताना दोन इसमांनी वृध्द नागरिकाला भुरळ पाडून जबरदस्तीने त्यांच्या हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी काढून घेतली. आणि काही क्षणात ते फलाट क्रमांक एकवरून नागरिकाला काही कळण्याच्या आत पसार झाले.
दोन इसम पळून गेल्यानंतर नागरिकाला आपल्या हातामधील दहा ग्रॅम वजनाची साठ हजार रूपये किमतीची सोन्याची अंगठी गायब असल्याचे आढळले. या नागरिकाने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर त्यांना कुर्ला रेल्वे स्थानकातही असाच प्रकार झाल्याचे चौकशीत आढळले.
वरिष्ठांच्या आदेशावरून मुंबई आणि कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने या दोन्ही प्रकरणांचा समांतर सुरू केला. पोलिसांनी गुन्हा घडलेल्या घटनांच्या ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यामध्ये दोन आरोपी प्रवाशांशी जवळिक साधून त्यांच्या जवळील सोन्याचा ऐवज चोरून नेत असल्याचे आढळले. दोन्ही गुन्ह्यातील चोरटे एकच असल्याचे आढळले.पोलिसांनी गुप्त माहितगारातर्फे माहिती काढल्यावर अशाप्रकारच्या चोऱ्या करणारे आरोपी हे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील आहेत. आणि ते मदारी टोळीचे सदस्य असल्याचे समजले.
पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे नाशिक शहर गाठले. तेथे येवला परिसरात तळ ठोकून आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले. अफजल अहमद मदारी (२३), मुश्ताक नजमुद्दीन मदारी (२१) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या जवळून पोलिसांनी कल्याण आणि कुर्ला येथे प्रवाशांकडून चोरलेला सोन्याचा दीड लाखाहून अधिक रकमेचा सोन्याचा ऐवज आणि इतर ३०० ग्रॅम वजनाचा दहा लाखाहून अधिक किमतीचा सोन्याचा ऐवज जप्त केला आहे.
कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, पोलीस निरीक्षक रोहित सावंत, उपनिरीक्षक अशोक होळकर, गजानन शेडगे, साहाय्यक उपनिरीक्षक महेश सुर्वे, हवालदार अमित बडेकर, अनिल खाडे, इम्रान शेख, हरीष संदानशिव, सोनाली पाटील, सिकंदर तडवी, सत्यजित कांबळे, सचिन वैरागर यांच्या पथकाने ही कारवाई केली.