ठाणे – लाडकी बहीण योजनेच्या हफ्ते सुरु राहावे यासाठी राज्य शासनाने ई – केवायसी अनिवार्य केल्याने लाभार्थी महिला वर्गाला मोठी कसरत करून आपली पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे. संकेतस्थळावर भार असल्याने दिवसा बहुतांश वेळा संकेतस्थळ बंदच असते. मात्र यावर तोडगा काढून आणि पडताळणी पूर्ण करण्यासाठी महिलांनी चक्क मध्य रात्री एक ते तीन वाजण्याच्या सुमारास ई – केवायसी प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे. तर काही महिलांनी पहाटे चार ते पाच वाजता उठून ही प्रक्रिया पूर्ण केल्याचे लोकसत्ताशी बोलताना सांगितले. यामुळे संकेतस्थळावरील अडथळे दूर करावी अशी मागणी योजनेच्या लाभार्थी महिलांकडून करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना ‘ई-केवायसी’ बंधनकारक करण्यात आली आहे. त्यासाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली असून, या नियमानुसार लाभार्थ्यांना ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी ही प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रक्रिया सुरू होताच एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर नोंदणी सुरू झाल्याने ‘ई-केवायसी’ संकेतस्थळ ठप्प झाल्याचे उघड झाले होते. लाभार्थ्यांच्या नोंदी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे दोन आठवड्यांपूर्वी स्पष्ट करण्यात आले होते.
नवीन नियमावलीनुसार लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि इतर माहिती भरून ऑनलाईन नोंदणी करून ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्त्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. तथापि, संकेतस्थळावर एकाच वेळी जास्त प्रमाणात प्रवेश झाल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे लाभार्थींना ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे येत असून, काहींना वारंवार प्रयत्न करूनही नोंदणी पूर्ण करता येत नाही आहे.
महिला व बालविकास खात्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतीच ठाण्यातील एक कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी देखील स्पष्ट केले की, लाडक्या बहिणींच्या ई केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. नोव्हेंबरपर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची मुदत आहे. ई-केवायसीसाठी सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत. दररोज जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींची ई केवायसी प्रक्रिया होत आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. मात्र अद्याप अनेक महिलांना ओटीपी न येणे, संकेस्थळ ठप्प असणे, वडिलांच्या अथवा पतीच्या मोबाईलवर ओटीपी न येणे यांसारखे अनेक अडथळे येत आहेत.
रात्री एक ते तीन या वेळेत, तर काही महिला पहाटे चार-पाच वाजता उठून ऑनलाईन प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करत आहेत. या वेळी संकेतस्थळावरील वापरकर्त्यांची संख्या कमी असल्याने प्रणाली जलद चालते आणि पडताळणी यशस्वीपणे पूर्ण होते. लोकसत्ताशी बोलताना अंबरनाथ येथे राहणाऱ्या हेमलता मोरे सांगितले की, “दिवसभर प्रयत्न करूनही ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे आम्ही रात्री प्रयत्न केला आणि तेव्हाच पडताळणी पूर्ण झाली .”