डोंबिवली : डोंबिवली, कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांनी मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारांच्या मिरवणुकांमुळे कल्याण, डोंबिवलीतील मिरवणूक मार्ग वाहन कोंडीत अडकले होते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. डोंबिवली पश्चिमेतील सम्राट चौक, दिनदयाळ रस्ता, महात्मा फुले रस्त्याने ते रेल्वे पादचारी पुलावरून स. वा. जोशी शाळेत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह दाखल झाले. ठाकुर्ली उड्डाण पुलावरून मिरवणूक नेण्यात आली तर पूल वाहन कोंडीत अडकेल असा विचार करून कार्यकर्त्यांनी भावे सभागृहाजवळील रेल्वे पादचारी पुलावरून नेहरू रस्त्यावर गणेश मंदिर येथे येणे पसंत केले. त्यामुळे ठाकुर्ली पुलावरील वाहन कोंडी टळली. या मिरवणुकीमुळे दिनदयाळ रस्त्यावर काही वेळ कोंडी झाली होती.

हेही वाचा…मुख्यमंत्री ३७ कोटींच्या संपत्तीचे मालक पण, वाहन मात्र बोलेरो, आरमाडा

कल्याण पश्चिमेत महायुतीचे उमेदवारी विश्वनाथ भोईर, महाविकास आघाडीचे सचिन बासरे, मनसेचे उल्हास भोईर, महायुतीमधून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणारे भाजपचे नरेंद्र पवार यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी कल्याण पश्चिमेतील खडकपाडा, साई चौक, मुंबई विद्यापीठ उपकेंद्र रस्त्यावर वाहन कोंडी झाली होती. मालवाहू वाहने, प्रवाशांना मिरवणुकांमुळे कोंडीचा फटका बसला.

भाजप कल्याण शहर अध्यक्ष वरूण पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जामुळे कल्याण पश्चिमेत नरेंद्र पवार, वरूण पाटील यांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. छाननीच्यावेळी उमेदवारी अर्जात तांत्रिक अडचण आल्यास पर्याय म्हणून महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपल्या नातेवाईकांचे पर्यायी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत.

हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या मिरवणुकीत चोरट्यांचा सुळसुळाट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिरवणुकीतील सहभागासाठी कार्यकर्ते टेम्पो, बस, रिक्षाने आणले जात होते. ही सर्व वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी करून ठेवण्यात आली होती. त्यामुळे वाहन कोंडीत आणखी भर पडली होती. कल्याणमधील शिवाजी चौक परिसरातील बाजारपेठांमध्ये दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची झुंबड होती. त्यामुळे या भागातील रस्ते वाहतूक कोंडीत अडकले होते.