कल्याण : पावसाने आता उघडिप दिली आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील खड्डे ठेकेदारांनी तातडीने योग्यरितीने खड्डे बुजविण्याची कामे पूर्ण करावीत. गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्ते सुस्थितीत पाहिजेत, असे आदेश कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना रविवारी दिले.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवर मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे प्रवासी, वाहन चालकांना त्रास होतो. प्रशासन खड्ड्यांमुळे टिकेचे लक्ष्य होत आहे. आयुक्त डाॅ. दांगडे यांनी रविवारी डोंबिवली, कल्याण शहरातील रस्त्यावरील खड्डे भरणीची कामे योग्यरितीेने सुरू आहेत की नाही याची पाहणी करण्यासाठी दौरा आयोजित केला होता. आयुक्त दांगडे यांनी सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांची प्रथम पाहणी केली. यामध्ये कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला रस्ता, गोविंदवाडी रस्ता, डोंबिवलीत घरडा सर्कल रस्ता, डाॅ. राजेंद्र प्रसाद रस्ता, पंचायत बावडी, शास्त्रीनगर कोपर रुग्णालय रस्ता, व्दारली रस्ता, पिसवली, आडिवली ढोकळी रस्त्यांची पाहणी केली.

हेही वाचा >>> वेळेत उपचार मिळाले नसल्याने शहापूरमध्ये आठ वर्षीय मुलाचा मृत्यू?

पावसाने उघडिप दिल्यापासून ठेकेदारांकडून खड्डे भरणीची कामे वेगाने सुरू असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. खड्डे भरणीची कामे डांबर खडी, सिमेंट खडी चुरा गिलावा, पेव्हर ब्लाॅकच्या माध्यमातून करण्यात यावीत. निकृष्ट पध्दतीचे काम सहन केले जाणार नाही. येत्या आठवडाभरात खड्डे भरणीची कामे पूर्ण करा, असे आदेश आयुक्तांनी ठेकेदारांना दिले. खड्डे भरणीची कामे करताना ठेकेदाराच्या कामगारांनी कल्याण डोंबिवली पालिकेचे नाममुद्रा असलेले चिन्ह आणि पालिकेने प्रस्तावित केलेली जॅकेट परिधान केली पाहिजेत. या कामात हयगय करणाऱ्या एका ठेकेदाराला आयुक्तांनी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. आता पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.

हेही वाचा >>> बदलापूर, अंबरनाथमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न; नवे उड्डाणपूल प्रस्तावित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खड्डे भरणीची कामे वेगाने पूर्ण करा. गणपतीपूर्वी शहरातील सर्व रस्ते सुस्थितीत असले पाहिजेत. रस्त्यावर खड्डे पडले आहेत, अशी एकही तक्रार प्रशासनाकडे येता कामा नये, अशी तंबी आयुक्तांनी ठेकेदारांना दिली. पालिका हद्दीत एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते आहेत. या विभागाच्या अधिकाऱ्यांना शहरातील रस्ते सुस्थितीत करण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. या पाहणी दौऱ्याच्यावेळी शहर अभियंता अर्जुन अहिरे, जनसंपर्क प्रमुख संजय जाधव, कार्यकारी अभियंता मंगेश सांगळे, जगदीश कोरे उपस्थित होते.