ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील दिवा रेल्वे स्थानकात वातानुकूलीत (एसी) रेल्वे गाडीच्या छतावर बसलेल्या तरुणाला विद्युत तारेचा झटका लागला. या घटनेत तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबईतील शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर काहीकाळ परिणाम झाला होता.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कल्याणच्या दिशेने वातानुकूलीत रेल्वेगाडी निघाली होती. ही रेल्वेगाडी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास दिवा रेल्वे स्थानकावर आली असता एक व्यक्ती रेल्वे गाडीच्या छतावर बसल्याचे आढळून आले. प्रवाशांनी तात्काळ याची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान (आरपीएफ), रेल्वे प्रशासनातील इतर कर्मचारी दाखल झाले.
प्रवासी आणि कर्मचारी तरुणाला छतावरुन उतरण्याची विनंती करत असतानाच, त्याला विद्युत तारेचा झटका बसला. त्याला तात्काळ उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील शीव रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, संबंधित तरुण त्या ट्रेनच्या छतावर कसा चढला आणि कुठल्या स्थानकातून चढला याचा तपास आरपीएफकडून सुरु आहे.
