लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : पंख्याची तार इलेक्ट्रीक बोर्डला लावण्यास विरोध केल्याने एका राजस्थानी मजूराची त्याच्याच मित्राने डोक्यात लोखंडी वस्तूने प्रहार करून हत्या केल्याचा प्रकार भिवंडीतील पडघा भागात उघडकीस आला आहे. सुरेंद्र चौधरी (२२) असे मृत मजूराचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी रमण सिंह (३६) याला अटक केली आहे. दोघेही मजूर राजस्थानच्या आलवर या जिल्ह्यात वास्तव्य करत होते. ते काही वर्षांपूर्वीच येथील गोदामामध्ये मजूरीसाठी आले होते.

भिवंडी येथील भोईरगाव परिसरात एका गोदामामध्ये सुरेंद्र चौधरी, रमण आणि त्यांच्यासह पाचजण मजूर म्हणून काम करतात. येथील गोदामात एका पत्र्याचे लहान आकाराचे शेड उभारण्यात आले असून याच शेडमध्ये पाचही जण वास्तव्य करतात. हे पाचही जण मूळचे राजस्थान आणि उत्तरप्रदेश येथील आहेत. १८ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास गोदामामधील कामे आवरून सर्व मजूर शेडमध्ये निघून गेले होते. रात्री जेवल्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी जात होते. रात्री १० वाजताच्या सुमारास रमण सिंह हा येथील इलेक्ट्रीक बोर्डमध्ये पंख्याची तार लावत होता. त्यास सुरेंद्र याने विरोध केला. त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यांचा वाद झटापटीपर्यंत गेला होता. त्यानंतर इतर मजूरांनी त्यांच्यामधील वाद सोडविला.

काही वेळानंतर रमण सिंह हा त्याठिकाणी आला. त्याने शेडमध्ये पडलेली लोखंडी वस्तू हातात घेऊन सुरेंद्र याच्या मागून त्या वस्तूने त्याच्या डोक्यात प्रहार केला. यात सुरेंद्र यांना गंभीर दुखापत झाली. ते जागीच कोसळले. त्यानंतर मजुरांनी आरडाओरड केला. रक्तस्त्राव झाल्याने सुरेंद्र याला येथील एका जेसीबी गाडीतून उपचारासाठी भिवंडीतील आयजीएम या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रमण हा देखील त्यांच्यासोबत रुग्णालयात गेला होता. परंतु सुरेंद्र याला डाॅक्टरांनी मध्यरात्री १२.३० वाजता मृत घोषित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी मजूराने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रमण याला ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे. रमण आणि सुरेंद्र हे राजस्थानमधील आलवर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गोदामामध्ये मजूरी करण्यासाठी ते मागील काही वर्षांपासून वास्तव्य करत होते. अतिशय क्षुल्लक कारणावरून सुरेंद्र याची हत्या झाल्याने मजूरांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.