डोंबिवली – डोंबिवली मोठागाव येथील माणकोली उड्डाण पूल गणपती विसर्जनाच्या चार दिवसांच्या कालावधीत दुपारी १२ ते रात्री गणपती विसर्जन होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. या कालावधीत माणकोली उड्डाण पूल मार्गे होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे, अशी माहिती डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी दिली.
या वाहतूक बदलाची अधिसूचना वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी काढली आहे. २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर या दिवशी पूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे.
डोंबिवलीतील गणेश भक्त गणपती विसर्जनासाठी अनेक वर्षापासून मोठागाव रेतीबंदर खाडी किनारच्या गणेशघाटाला पसंती देतात. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी मोठागाव गणेशघाट येथ भाविकांची गणपती, गौरी विसर्जनासाठी मोठी गर्दी होते. तसेच, डोंबिवली शहर परिसरातील गणेश भक्त रेतीबंदर चौक रस्ता, रेतीबंदर रेल्वे फाटकातून मोठागाव माणकोली उड्डाण पूल दिशेने पायी, वाहनाने गणपती विसर्जनासाठी जातात.
माणकोली पूल सुरू झाल्यापासून मधला मार्ग म्हणून ठाणे, मुंबई, भिवंडी परिसरातील प्रवासी डोंबिवलीतील माणकोली उड्डाण पुलाला पसंती देत आहेत. या नियमितच्या वाहनांमुळे रेतीबंदर रेल्वे फाटक, उमेशनगर, पंडित दिनदयाळ रस्ता, रेतीबंदर रेल्वे फाटक ते माणकोली पूल रस्ता वाहनांनी गजबजून गेलेला असतो. या गर्दीत गणेशभक्तांची वाहने एकाचवेळी आली तर अभूतपूर्व वाहतूक कोंडी माणकोली पूल भागात होण्याची शक्यता असल्याने वाहतूक विभागाने गणपती विसर्जनाच्या चार दिवशी माणकोली उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवेश बंद व पर्याय
ठाणे, मुंबई येथून माणकोली पुलाकडे येणाऱ्या वाहनांना मुंबई नाशिक महामार्गाजवळ नारपोली वाहतूक हद्दीतील अंजुर दिवेगाव, लोढा धाम, माणकोली येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने अंजुरफाटा, भिवंडी बाह्यवळण रस्त्याने इच्छित स्थळी जातील. कल्याण,अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई येथूून माणकोली पुलाकडे जाणाऱ्या वाहनांना पत्रीपूल, टाटा नाका, सुयोग हाॅटेल, डीएनएस बँक सोनारपाडा, मानपाडा चौक, घरडा सर्कल प्रवेश बंंद करण्यात येणार आहे. ही वाहने दुर्गाडी, गांधारे पुलावरून इच्छित स्थळी जातील. ठाकुर्ली, डोंबिवलीतून ठाकुर्ली पूल, कोपर पूल येथून जाणाऱ्या वाहनांना कोपर पूल, ठाकुर्ली पूल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने दुर्गाडी पूल, गांधारे पूल येथून इच्छित स्थळी जातील. डोंबिवलीतून मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकमार्गे जाणाऱ्या वाहनांना मोठागाव माणकोली येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने पत्रीपूल दुर्गाडी चौकातून इच्छित स्थळी जातील.