Manoj Jarange Patil Mumbai Protest ठाणे – मराठा समाजाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत दाखल होत आहेत. अशातच नवी मुंबईतूनही अनेकजण या उपोषणात सहभागी होत आहेत. नवी मुंबईतील आंदोलकांनी नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकावर गोंधळ घातल्याचे दिसून आले. जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडत असल्याचे चित्र होते. तर काही आंदोलक खेळखेळत असल्याचे चित्र होते.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांचे आंदोलन वेग घेत आहे. मुंबईत सुरू असलेल्या या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या नागरिकांचा पाठिंबा मिळत असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे दाखल होत आहेत. नवी मुंबईतील आंदोलक या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवर आंदोलकांची गर्दी उसळली आहे. तर मुंबईकडे जाण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये देखील आंदोलकांची गर्दी पाहायला मिळाली.
मराठा आरक्षण मागणी आंदोलनचा आज चौथा दिवस असून आता मुंबई पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले आहेत. सुमारे वीस हजार पेक्षा अधिक आंदोलक नवी मुंबईत मुक्काम करतात आणि दिवसा आंदोलन स्थळी म्हणजेच मुंबईतील आझाद मैदानात जातात. या शिवाय आंदोलकांच्या रोज कित्येक गाड्या राज्यातील विविध भागातून मुंबईत जात आहेत. याचा ताण मुंबई रेल्वे वाहतूकीस बसला आहे. या गर्दीमुळे स्थानक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
काही ठिकाणी तरुणांनी घोषणाबाजीसह खेळ आणि हुल्लडबाजी सुरू केली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आंदोलक हे वाशी स्थानकात खेळ खेळत असल्याचे दिसून आले. तर अनेकजण रेल्वे रूळ ओलांडून जीव धोक्यात घालून प्रवास करीत होते. या गोष्टी टाळण्यासाठी पोलीस प्रयत्न करित होते. तर अनेक जण रेल्वे गाडीत जाण्यासाठी गर्दी करीत होते.
वाशी पथकर नाकाही कोंडीत
मराठा आंदोलकांमुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असल्याने आज पासून मुंबईत प्रवेश करणाऱ्या गाड्यांची तपासणी मुंबई पोलिसांनी सुरु केली आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा सुमारे पाच किलोमीटर पर्यंत लागल्याचे चित्र होते. शीव पनवेल महामार्गांवर मुंबई दिशेला सकाळ पासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. खाडी पूल ते अगदी सानपाडा असे सुमारे चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. दुपारी ही रांग काहीशी कमी झाली असली तरी नाकाबंदी अधिक कडक असल्याने वाहतूक कोंडीचा फटका वाहन चालकांना बसत आहे.