Manoj Jarange Patil Mumbai Protest ठाणे : मुंबई येथील आझाद मैदानात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाचा फटका संपूर्ण मुंबई, ठाणे नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर बसला आहे. नोकरदार वर्गाला याचा प्रचंड त्रास होत आहे. या प्रकारावरुन उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला असून मंगळवारी दुपारपर्यंत मुंबईतील सर्व रस्ते, पदपथ, रेल्वे, बस स्थानके मोकळे आणि स्वच्छ करण्यास बजावले आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील आनंद नगर टोलनाका येथे पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली असून याठिकाणी सर्व वाहनांची चौकशी करुन वाहने मुंबईत सोडले जात आहे.
यामध्ये ज्या गाड्या मराठा आंदोलकांच्या आहेत त्या बाजूला करण्यात येत आहे. परिणामी, याठिकाणची वाहतूक संथ गतीने सुरु असून वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे नोकरिनिमित्त निघालेल्या नोकरदार वर्गाला देखील यात अडकून रहावे लागले असून याठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करीत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
राज्यभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे आझाद मैदान आणि परिसर आंदोलकांच्या गर्दीने गजबजलेला आहे. आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आझाद मैदानासह आसपासचे परिसर आणि रेल्वे स्थानक परिसर आंदोलकांच्या गर्दीमुळे गजबजलेले आहेत. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना तसेच नोकरदार वर्गाला बसत आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर अनेक नोकरदारांनी सोमवारी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला होता.
या आंदोलनामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत असल्यामुळे उच्च न्यायालयाने याप्रकारावर संताप व्यक्त केला आहे. तसेच मंगळवारी दुपार पर्यंत मुंबईतील सर्व रस्ते, पदपथ, रेल्वे, बस स्थानके मोकळे आणि स्वच्छ करण्याची नोटीस बजावली आहे. तसेच नविन आंदोलकांना मुंबईत सोडू नका असे आदेश देखील उच्च न्यायालयाने दिले आहे. या आदेशानुसार ठाणे टोलनाक्याला मुंबई तसेच ठाणे पोलिसांकडून मोठ्याप्रमाणात नाकाबंदी करण्यात आली आहे.
प्रत्येक वाहनाची चौकशी करुनच त्याला मुंबईत प्रवेश दिला जात आहे. यातील मराठा आंदोलनाच्या गाड्या बाजूला करण्यात येत आहेत. त्यामुळे यामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरु आहे. परिणामी याठिकाणी मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. याचा फटका मुंबईकडे जाणाऱ्या इतर प्रवाशांना देखील बसत आहे.