ठाणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी हजारो आंदोलक मुंबई नाशिक महामार्गाने मुंबईच्या दिशेने निघाले होते. या आंदोलकांना चहा, न्याहरी, दुपारचे जेवण मिळावे उपलब्ध व्हावे यासाठी ठाण्यातील मराठा क्रांती मोर्चा आणि ठाण्यातील नांदेड जिल्हा सामाजिक संस्थेने आनंदनगर टोलनाका येथे खाद्य पदार्थ उपलब्ध करुन दिले. मराठा मोर्चासाठी निघालेल्या आंदोलकांना जेवण आणि मुंबईचा वडापाव खाण्यास मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला.

मराठा समाजासाठी ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहेत. या निर्णायक लढ्याला राज्यभरातून मराठा बांधवांचा मोठा पाठिंबा मिळत असून, ठाण्यातील मराठा समाजही सज्ज झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठीचा आवाज ठाण्यातूनही बुलंद होणार आहे. या आंदोलनासाठी येणाऱ्या हजारो आंदोलनकर्त्यांच्या भोजन आणि पाणी व्यवस्था करण्याचा निर्णय ठाण्यातील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. विशेषतः नाशिक मार्गे मुंबईत येणाऱ्या आंदोलनकर्त्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा ठाणेकर मराठा कार्यकर्त्यांकडून उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

ठाण्यातील लोकमान्य नगर भागात राहणाऱ्यांनी नांदेड जिल्हा सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेने मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पहाटे पासूनच तयारी सुरु केली होती. ठाण्यातील डाॅ. पांडुरंग भोसले, संस्थेचे अध्यक्ष निळकंठ पाटील- शिंदे, उपाध्यक्ष गणेश बामणे, कार्याध्यक्ष माणिक ढाले यांच्यासह संस्थेचे २५ ते ३० सदस्य सकाळपासूनच आनंद नगर टोलनाका येथे राज्यातील विविध भागातून येणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी उभे होते. त्यांनी येणाऱ्या आंदोलकांसाठी चहा, पोहे, केळी, दुपारचे जेवण, वडापाव उपलब्ध केले होते. आंदोलकांना यामुळे मोठा दिसाला मिळाला होता. आम्ही इतक्या लांबून आलो होतो. परंतु या संस्थेने जेवण उपलब्ध केल्याने दिसाला मिळाल्याचे एका आंदोलकाने सांगितले.

सकाळी ६ वाजेपासून आम्ही आनंदनगर टोलनाक्यावर उभे होतो. सुमारे चार ते पाच हजाराहून अधिक आंदोलक येथे न्याहरी आणि जेवून गेले असे नांदेड जिल्हा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निळकंठ पाटील यांनी सांगितले.